ओम पुरी , अमिताभ बच्चन आणि नूतनचे किस्से

OM Puri - Nutan - Amitabh Bachchan

दुसऱ्या देशात असतो तर डोके कलम झाले असते – ओम पुरी

कलाकार आणि वादाचा फार जवळचा संबंध आहे. देशात होणाऱ्या गोष्टींबाबत कधी कधी कलाकार असे काही वक्तव्य करतात की, ज्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाचे धनी व्हावे लागते. चौफेर टीका झाल्यानंतर माफीही मागावी लागते. अशाच एका माफी प्रकरणात अभिनेता ओम पुरी यांनी माफी मागत दुसऱ्या देशात असतो तर लोकांनी माझे हात आणि डोके कलम केले असते, असेही म्हटले. काय होते हे प्रकरण आणि का त्यांना माफी मागावी लागली याची उत्सुकता तुम्हाला असेलच.

ओम पुरीचे वडील काही काळ भारतीय सैन्यात होते आणि ओम पुरी यांनाही लहानपणी सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. एका वृत्तवाहिनीवर उरी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात बोलताना ओम पुरी यांनी मुक्ताफळे उधळत, सैनिकांना सैन्यात भर्ती होण्यास कोणी सांगितले होते, असा प्रश्न करीत त्यांना शस्त्रे उचलण्यास कोणी सांगितले होते, असेही म्हटले. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. ओम पुरी यांच्यावर सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला. तेव्हा ओम पुरी यांनी माफी मागितली. मला माझी लाज वाटते. मला शिक्षा झाली पाहिजे, उरीत शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांची मी माफी मागतो, असेही म्हटले. एवढेच नव्हे तर शहीद बीएसएफ जवान नितीन यादवच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांची भेट घेतली. नितीन यादवला श्रद्धांजलीही वाहिली. त्यावेळी बोलताना ओम पुरी यांनी म्हटले, “मी चर्चासत्रात भारतीय जवानांचा अपमान केला. ती माझी मोठी चूक होती. जर मी दुसऱ्या देशात असतो आणि असे बोललो असतो तर आतापर्यंत माझे हात आणि डोके कलम करण्यात आले असते.

” जेव्हा अमिताभने विनोद खन्नाची हनुवटी फोडली होती

विनोद खन्नाची पर्सनॅलिटी, त्याचा अभिनय आणि त्याचे देखणेपण सगळ्यांनाच मोहित करणारे होते. विनोद खन्नाच्या प्रशंसकांची संख्याही प्रचंड होती. त्यामुळेच विनोद खन्नाच्या काळात असलेल्या अमिताभसह अनेक नायकांना विनोदबद्दल आकस होता. असे असले तरी अमिताभ आणि विनोद खन्नाने अनेक चित्रपट एकत्र केले. प्रत्येक चित्रपटात अमिताभ विनोद खन्नापेक्षा आपण श्रेष्ठ असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत असे; पण विनोद खन्ना मात्र तसे करीत नसे. त्यामुळेच तो भाव खाऊन जात असे. अमिताभ आणि विनोद खन्नामध्ये पटत नसल्याची चर्चा तेव्हा जोरात होती.

याच दरम्यान ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये अमिताभ आणि विनोद खन्ना एकत्र काम करीत होेते. चित्रपटात अमिताभ आणि विनोद खन्ना यांच्यात हाणामारीचे एक दृश्य होते. या दृश्यात अमिताभला विनोद खन्नाच्या अंगावर ग्लास फेकून मारायचा होता. दृश्य सुरू झाले; पण अमिताभने विनोद खन्ना तयार होत असतानाच त्याला ग्लास फेकून मारला. ग्लास विनोद खन्नाच्या हनुवटीवर लागला आणि रक्तबंबाळ झाले. ताबडतोब दृश्य थांबवून विनोद खन्नाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. विनोद खन्नाच्या हनुवटीवर सहा टाके पडले. जर तो ग्लास आणखी थोडा वर लागला असता तर मात्र विनोद खन्नाचा संपूर्ण चेहरा खराब झाला असता. अमिताभने मुद्दाम विनोद खन्नाला जखम केली अशी चर्चा त्या काळात जोरदारपणे सुरू होती. पण अमिताभला चांगला मित्र मानत असल्याने विनोद खन्नाने याबाबत कधीच कोणाकडेही कसलीही प्रतिक्रिया दिली नाही.

नूतनला बघून स्कूटरवरून पडले होते अमिताभ बच्चन

अमिताभ आणि नूतनने ‘सौदागर’ चित्रपटात प्रथमच एकत्र काम केले होते. परंतु तेव्हा नूतन बॉलिवूडची यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री होती तर अमिताभ बच्चन संघर्ष करीत होते. अमिताभ जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांना नूतन खूप आवडायची. तिला बघून ते एकदा स्कूटरवरून पडता पडता वाचले होते. स्वतः अमिताभ बच्चन यांनीच हा किस्सा सांगितला होता. अमिताभ बच्चन तेव्हा दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. त्यांना चित्रपट पाहण्याची आवड होती आणि नूतन त्यांची आवडती नायिका होती. त्यामुळे तिला पाहण्याचीही त्यांची इच्छा होती.

एकदा ते कॅनॉट प्लेस येथून स्कूटरवरून जात होते. त्यांनी अचानक रस्त्यात नूतनला तिचे पती रजनीश बहल यांच्याबरोबर जाताना पाहिले आणि ते थक्कच झाले. त्यामुळे त्यांनी लगेचच ब्रेक मारला; परंतु गाडी वेगात असल्याने स्कूटर घसरली आणि ते रस्त्यावर पडणारच होते; पण त्यांनी स्वतःला सावरले होते. त्यानंतर ‘सौदागर’मध्ये या दोघांनी एकत्र काम केले. त्यावेळी आठवण सांगताना अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते, नूतन सेटवर वेळेवर यायची. सकाळी सहाची शिफ्ट असेल तर ती सगळ्यांच्या अगोदर तयार होऊन बसत असे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER