कोल्हापुरात ६०० रुपयाची लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात

IMG-20190911-WA0025

कोल्हापूर :-  विहिरीची ऑनलाईन सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी ६०० रुपयाची लाच स्वीकारताना तलाठी गणेश दत्तात्रय शिंदे (वय २७. रा. पंचरत्न कॉलनी. कसबा बावडा) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले. गणेश शिंदे हा करवीर तालुक्यात दऱ्याचे वडगाव आणि कोगील बुद्रुकचा तलाठी आहे. दर्याच वडगाव या गावात तक्रारदाराची वडीलोपार्जीत शेती आहे. या शेत जमिनीमध्ये जवाहर अनुदान योजने अंतर्गत तक्रारदाराने विहीर खोदली आहे. या विहिरीची नोंद हस्तलिखित सात बाऱ्यावर घेतली आहे. परंतु ऑनलाईन सातबाऱ्यावर घेतलेली नाही. या नोंदीसाठी तक्रारदाराने तलाठी गणेश शिंदे याची वेळोवेळी भेट घेऊन ऑनलाईन नोंदीसाठी अर्ज देण्याबाबत विचारणा केली होती. परंतु अर्जाची काही आवश्यकता नाही असे उत्तर गणेश शिंदे याने देऊन अर्ज स्वीकारला नाही. ७ सप्टेंबर रोजी तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी विभागात जाऊन शिंदे याची भेट घेतली आणि ऑनलाईन नोंदीबाबत चर्चा केली. यावेळी शिंदे याने नोंदीसाठी ६०० रुपये लाचेची मागणी केली. त्याबाबत तक्रारदाराने बुधवारी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शिंदे याच्या विरुध्द तक्रार दाखल केली. शिंदे याला सापळा लावून पथकाने पकडले.

ही बातमी पण वाचा : सीईओ यांच्या मनमानी बद्दल झेडपी सभेत नाराजी

ही बातमी पण वाचा : कोल्हापुरात शस्त्र तस्करीचे मोठे रॅकेट उघड