बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे; शरद पवारांचा सल्ला

Uddhav Thackeray & Sharad Pawar

मुंबई : वाढवण बंदराचा प्रश्न  पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मध्यस्थी केली आहे. नुकतेच ते वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि मच्छीमार संघटनांच्या शिष्टमंडळाला भेटले. यावेळी त्यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन त्यांनी या शिष्टमंडळाला दिले. तसेच, बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) शब्द प्रमाण मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वाढवण बंदराला स्थानिकांचा असलेला विरोध पाहता आपल्या भूमिकेवर ठाम राहावे, असा सल्लाही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

शरद पवारांसोबतच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही या बंदरविरोधी समितीच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले, केंद्राने वाढवण बंदराची घोषणा केल्यानंतर स्थानिकांचा विरोध वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आल्यानंतर पूर्वीही मी आपल्यासोबत होतो, आताही मी तुमच्यासोबत असल्याची ग्वाही पवार यांनी संघर्ष समितीला दिली होती. त्यानंतर आजपर्यंत अनेक संघटनांनी, स्थानिक आमदार, खासदारांनी वाढवण बंदराला आपला विरोध असल्याचे पत्र बंदरविरोधी समितीला दिले आहे.यावेळी पवार यांनी बाळासाहेबांनी दिलेल्या शब्दांची मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली. बाळासाहेबांनी बंदराला स्थानिकांचा कडवा विरोध पाहता त्यांच्यासोबत राहात बंदर होऊ दिले नव्हते. आजही स्थानिकांचा विरोध वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांच्या सोबत राहावे, यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्याशी चर्चा करून स्थानिक खासदार राजेंद्र गावित यांच्यासोबत हे बंदर रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. असे असले तरी वाढवणमध्ये सर्वेक्षणाच्या हालचालीदरम्यान स्थानिकांनी उभ्या केलेल्या आंदोलनात अनेक लोकप्रतिनिधींच्या असलेल्या गैरहजेरीमुळे स्थानिकांच्या मनात संशयाचे ढग जमू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर झाई ते कुलाबादरम्यानच्या किनारपट्टीवरील स्थानिकांनी उभारलेल्या अभूतपूर्व एकजुटीची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेत संघर्ष समिती, मच्छीमार संघटनांना भेटीला बोलावले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे डहाणूमध्ये एका खाजगी कार्यक्रमाला येऊन गेल्यानंतर जिल्ह्यात उलटसुलट चर्चा रंगल्याच्या पार्श्वभूमीवर वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध पाहता आघाडी सरकारने स्थानिकांसोबत राहावे, यासाठी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ आदी संघटनांनी शुक्रवारी यशवंतराव प्रतिष्ठान सेंटर, मुंबई येथे शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. लोकमतने हे वृत्त दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER