जे जे दिसे इष्ट ते ते घ्यावे, तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यास…

Shailendra Paranjapeकेंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी दिलेला इशारा संपूर्ण देशाने गंभीरपणे घेण्याची गरज आहे. करोनाची तिसरी लाट नक्की देशावर धडकणार आहे पण ती केव्हा धडकेल आणि किती तीव्रता असेल, हे सांगू शकत नाही, असं त्यांनी नमूद केलंय.

त्यांच्या इशाऱ्याचा वेध घेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या जनतेला केलेल्या मार्गदर्शनात करोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेसाठी सिद्ध राहण्याचं आवाहन केलंय. त्याबरोबरच राज्यामधे मिशन ऑक्सिजन सुरू करत असल्याची त्यांनी घोषणा केलीय. या प्राणवायू मोहिमेद्वारे येत्या जूनअखेरपर्यंत अतिरिक्त ३८२ प्राणवायू कारखाने उभे राहतील. सध्या महाराष्ट्राला १८०० मेट्रिक टन प्राणवायूची गर असून त्यापैकी १२९५ मेट्रन राज्यात तयार होतो तर पाचशे मेट्रिक टन हा राज्याबाहेरून विविध प्रकारे मिळवला जातो.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबई महापालिकेच्या कामाचं कौतुक केलंय आणि केंद्र सरकार तसंच दिल्ली सरकारलाही मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्याशी चर्चा करून करोना उपाययोजनांची माहिती घ्यावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं दिल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला सांगितलंय. सगळेच राजकारणी अनेकदा सोयीची माहिती जनतेला देत असतात आणि ती देताना अर्थातच त्यांच्या राजकीय फायद्याचा विचार त्यामागे असतो. त्यामुळे न्यायालयाने मुंबई पालिकेचे कौतुक करताना केंद्र सरकारला आणि दिल्ली सरकारलाही मुंबईकडून शिका, असं म्हटलंय. तसं असल्यास कळीचा प्रश्न हा उपस्थित होतो की केंद्र सरकारनं आणि दिल्ली सरकारनं मुंबई आयुक्तांकडून जे शिकायला हवं, तेच नेमकं खरे तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिकायला हवेय. अर्थात, माझं बोलणं तुम्ही ऐकू शकताय पण मला तुमचं बोलणं ऐकू येऊ शकत नाही, हे मामु माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळे ते त्यांच्या घरातून बाहेर पडतील आणि मुंबई आयुक्तांनी नेमकं काय केलंय, याची माहिती थेट आयुक्तांकडूनच घेतील, ही शक्यता दुरापास्तच आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येणार, असं स्वतः ठाकरे अनेकदा बोलले होते. पण ते सांगतानाच राज्यात त्यांनी काय तयारी केली, हे सध्या देशात महाराष्ट्राचा क्रमांक करोनामधे सर्वात वर आहे, यातून स्पष्टच आहे. एकीकडे दुसऱ्या लाटेत नाकातोंडात पाणी जाऊन महाराष्ट्राची अब्रू वेशीला टांगली गेलीय आणि तिसऱी लाट गृहीत धरून तयारी करा, असं हे सांगताहेत. म्हणजे दहावी नापास होतानाच आयएएस व्हायची तयारी करा, असं सांगण्यासारखंच नाही का…

तिसरी लाट येणार, हे केंद्र सरकारच्या सल्लागारांनीच सांगितलेले असल्याने किमान देर आये दुरुस्त आये, असं म्हणून यांच्या तयारीच्या घोषणेकडे बघितलं तरी मुळात यांनी राज्य सोडलंय ते स्थानिक प्रशासनाकडे. त्यामुळे राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणावर लशीकरण करणं, लस असो की प्राणवायू किंवा रेमडिसिव्हर, कोणत्याच गोष्टीची महाराष्ट्राला कमतरता भासणार नाही, यासाठी आत्तापासूनच जगातले शक्य ते सर्व पर्याय पडताळून बघायला हवेत. प्रसंगी केंद्राशी पंगा घेऊन आमच्या राज्यात आम्ही सरकार, हे ठणकावून सांगत जगातून कोठूनही लस आणू, औषध आणू, इंजेक्शन आणू आणि वेळ पडली तर राज्यातल्या सर्व डॉक्टर्स नर्सेस यांना करोना तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यात जोडून घेऊ हे करायला हवे. इतकं सारं आत्मविश्वासाने आपले मुख्यमंत्री करतील का, म्हणजे तसं तुम्हाला वाटतंय का….

या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यात एका रुग्णालयात पन्नास खाटांची कोविड उपचार व्यवस्था लहान मुलांसाठी केली जात आहे, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. अशीच व्यवस्था सर्व शहरांमधे होण्याची गरज आहे कारण दुसऱ्या लाटेत घरातल्या सर्वच सदस्यांना करोना लागण झाल्याचे दिसून आलेय. अशा वेळी चार माणसे चार रुग्णालयात ही ससेहोलपट होऊ नये, यासाठी विविध वयोगटातल्या कुटुंबसदस्यांना एकाच छताखाली करोना उपचार देण्याचा विचारही आत्तापासूनच करायला हवा.

मुंबई पालिकेकडून केंद्र आणि दिल्ली सरकार काय शिकायचं ते शिकतील. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी पुण्यातून आलेल्या बातमीतून राज्यात कोविड उपचारांच्या ठिकाणीच लहान मुलांवर कोविड उपचारांसाठी स्वतंत्र उपकेंद्र म्हणा किंवा वॉर्डची तरी सिद्धता ठेवावी. मुंबई पुणेच नाही तर करोना काळात दिसून आलेल्या विविध सकारात्मक बाबी करोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्धच्या लढ्यात समाविष्ट करून घ्यायला हव्यात. तसं झालं तरच तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्याची तयारी केल्यासारखं होईल. नाही तर झाली आहेच आपल्याला सवय, करोनाबरोबर राहण्याची….करोनाची असो किंवा नसो.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button