शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी रस्त्यावर उतरू – राजू शेट्टी

Raju Shetty

सांगली : राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. गरज पडल्यास यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून १५ हजार कोटी आणि केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून केंद्र शासनाने ३५ हजार कोटी रुपये भरपाई द्यावी, अशी राजू शेट्टी यांनी केली.

आज ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या पावसाने सर्वच विभागातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी. भाजपाचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना हेक्टरी २५ हजाराची मदत देण्याची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री आहेत; त्यांनी या त्या मागणीची अंमलबजावणी करावी.

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. शेतक-यांचे सलग दोन वर्षे नुकसान झाले असून हा जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावरही आपत्ती निवारण फंड तयार करावा. त्यामुळे शेतक-यांना अधिक न्याय मिळू शकेल. आम्ही राज्य शासनाला पाठिंबा दिला असला तरी शेतक-यांच्या प्रश्नावर लढायचे सोडणार नाही, असे ते म्हणाले.

परिषद घेणारच

राज्य शासनाकडे आम्ही येत्या २ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूरला ऊस परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे. परवानगीची मागणी केली असून परवानगी मिळाली नाही तरी परिषद घेणारच. कोरोना काळातील सर्व नियम पाळून आम्ही परिषद घेण्यास तयार आहोत, असे शेट्टी म्हणाले.

भाजपाला पाठिंबा पण, केंद्राकडेही मदत मागा

राज्य शासनाकडे नुकसानभरपाईसाठी भाजपाने केलेल्या मागणीस आमचा पाठिंबा असून केंद्राकडेही त्यांनी याबाबत पाठपुरावा करावा, असे शेट्टी म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER