वीज बिलाच्या सवलतीसाठी रस्त्यावर उतरू; रक्षा खडसे यांचा सरकारला इशारा

Raksha Khadse & uddhav Thackeray

मुक्ताईनगर : वीज बिलात ग्राहकांना सवलत देण्याबाबत सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपाच्या (BJP) खासदार व एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सूनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी दिला. वीज बिलात सवलत देता येणार नाही. ग्राहकांना वापरलेल्या विजेचे बिल द्यावे लागेल, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितल्यावर प्रतिक्रिया देताना रक्षा खडसे म्हणाल्या, वीज ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे.

मात्र, सरकारने याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास जनहितासाठी भाजपा रस्त्यावर उतरेल. त्या म्हणाल्या, ‘जेवढं बिल आलं आहे, तेवढं बिल ग्राहकांना भरावंच लागेल’, असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. ऊर्जामंत्र्यांचं वक्तव्य सपशेल चूक आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बिल माफ करू, असे आश्वासन   जनतेला दिले होते. नितीन राऊत हे एक चांगले नेते आहेत. त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता.

संपूर्ण वीज बिल माफ करू शकले नसले तरी काही प्रमाणात ग्राहकांना सवलत द्यायला हवी. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपाला सतत आंदोलन करण्याची गरज पडते आहे. भाजपा वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी आंदोलन करते आहे.

विदर्भवादी आक्रमक

वीज बिलात सवलत देण्याची भाषा करणाऱ्या ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवला याविरोधात विदर्भवादी आक्रमक झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ७ डिसेंबरला विदर्भात तालुकापातळीवर विदर्भवादी ठिय्या आंदोलन करणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात ऊर्जा विभागाने अवास्तव बिले पाठवली आहेत.

याविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलने  केली; संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर वीज बिलात सवलत देऊ, असा शब्द ऊर्जामंत्र्यांनी दिला होता. मात्र, आता अचानक ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवला. वीज बिलाची थकबाकी वसूल करू आणि बिल न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शन कापू, असं  सांगितलं. याविरोधात विदर्भवादी हिवाळी अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी विदर्भात तालुकास्तरावर ठिय्या आंदोलन करणार आहेत, असे विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER