‘त्या’ तबलिगींविरुद्ध कठोर कारवाई करा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई :- ‘तबलिगी जमातच्या ‘मरकज’मधून आलेले अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या यादीत तबलिगी व त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या बाबतीत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. कुठलाही धार्मिक अभिनिवेश न बाळगता आपण या संदर्भातील कारवाई करावी.’ अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

लॉकडाऊनला १४ दिवस पूर्ण होत असताना आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होते आहे. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी काही पुढील मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. ‘केंद्र सरकारने तीन महिन्यांचं धान्य रेशन दुकानांतून निःशुल्क देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यातील ९० टक्के कोटा राज्याला मिळालादेखील आहे. मात्र, त्याचे अद्याप वितरण झालेले नाही. देशातील १६ राज्यांनी रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांनाही धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रालाही असा निर्णय घेणे शक्य आहे.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने डॉक्टर व आरोग्यसेवक बाधित होत आहेत. याकडॆ त्वरित लक्ष देण्याची विनंती फडणवीस यांनी केली आहे. सरकारच्या सर्व निर्णयांना भाजपचा पाठिंबा आहे, अशी ग्वाही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.