कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्या – अनिल देशमुख

कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा

Anil Deshmukh

वाशिम: कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याने जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती आहे. मात्र, भविष्यात सुद्धा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २८ मे रोजी आयोजित कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्था विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवनकुमार बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक दक्ष राहून काम करावे. १ मे पासून इतर जिल्ह्यातून व परराज्यातून सुमारे ३० हजार पेक्षा अधिक नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. या सर्व नागरिकांना विलगीकरणात ठेवून त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत विशेष खबरदारी घेण्यात यावी. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये आवश्यक मनुष्यबळ व सामग्री उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरात लवकर उपचार मिळणे शक्य होईल. कोविड हेल्थ सेंटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व आरोग्य विषयक सुविधा सज्ज ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

ग्रामीण भागात काम करणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका तसेच पोलीस व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सुद्धा आरोग्याची काळजी घ्यावी. महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्क निर्मिती प्रोत्साहन द्यावे, असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक रेशनकार्डधारक व ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशा व्यक्तींना सुद्धा शासन नियमानुसार धान्य पुरवठा करण्याची कार्यवाही गतीने करावी.

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. ठाकरे यांनी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक साधनांचा पुरवठा करण्यात आल्याचे सांगितले.

खासदार गवळी म्हणाल्या, जिल्ह्यातील आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगले काम होत असून त्यांना आवश्यक साधनांचा पुरवठा केला जावा.

आमदार पाटणी म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगल्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच फिव्हर क्लिनिकमध्ये रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

आमदार झनक म्हणाले, कापूस खरेदीला गती देण्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेणेकरून आगामी पावसाळ्यापूर्वी कापसाची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत केलेल्या उपाययोजना, स्थलांतरीत मजुरांची व्यवस्था, आरोग्य विषयक सज्जता, विविध उपाययोजना याविषयी जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी माहिती दिली. तसेच पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी दिली.


Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER