मृतदेहांसोबत प्रचार रॅली काढा, ममता बॅनर्जींच्या ऑडिओ क्लीपने नवं वादंग

Mamata Banerjee

कोलकाता :- पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात सध्या ऑडिओ क्लीपचा सर्वाधिक प्रसार केला जात आहे. आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांच्या एका कथित ऑडिओ क्लिपने खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ममतादीदी मृतदेहांसोबत प्रचार रॅली काढण्याचे उमेदवारांना सांगत आहेत. त्यामुळे ममता दीदींवर टीकेचे बाण सोडले जात आहे.

ही ऑडिओ क्लिप भाजपने व्हायरल केली आहे. या क्लिपमध्ये ममता बॅनर्जी या शीतलकुची विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराशी चर्चा करत आहेत. त्यात त्या सीआरपीएफच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या लोकांच्या मृतदेहांसोबत रॅली काढण्यास सांगत आहेत. भाजपने ही ऑडिओ क्लिप जारी केल्यानंतर बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेहांवरही आता टीएमसी राजकारण करत असल्याचा आरोप भाजपकडून केला गेला आहे. तर टीएमसीने ही ऑडिओ क्लिप बोगस असल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकारचं कोणतंच संभाषण झालं नाही, असं टीएमसीने म्हटलं आहे. तर, या ऑडिओ क्लिपबाबत निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करणार असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

दरम्यान, ही क्लिप खरी आहे की नाही माहीत नाही. मात्र, त्यातील आवाजावरून ममता बॅनर्जी आणि शीतलकुचीचे टीएमसीचे उमेदवार प्रीतम राय यांच्यात संभाषण सुरू असल्याचं दिसून येतं. मृतदेहांसोबत रॅली काढण्यास सांगून ममता बॅनर्जी या दंगा भडकावण्यास उत्तेजित करत असल्याचा आरोप भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे.

कुचबिहारचे पोलीस अधीक्षक आणि सीआरपीएफ जवान फसतील अशा प्रकारे हे प्रकरण वाढवा, असं ममता बॅनर्जी सांगत असल्याचा आरोप मालवीय यांनी केला आहे. केवळ अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनीही ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला आहे. केवळ राजकारणासाठी ममता बॅनर्जी मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कृत्याबाबत टीएमसीला लाज वाटली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया नड्डा यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button