कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्याला वेड्यांच्या इस्पितळात भरती करा; वडेट्टीवारांचा पलटवार

take-karnataka-deputy-chief-minister-to-mental-hospital-says-vijay-wadettivar

नागपूर : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांनी ‘बेळगाव सोडा, मुंबईसुद्धा कर्नाटकचा भाग आहे. ती आमची असून, याबाबत केंद्राकडे मागणी करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay-wadettivar) यांनी सवदी यांच्यावर पलटवार केला. त्या उपमुख्यमंत्र्याला वेड्यांच्या इस्पितळात भरती करा, असे म्हणत वडेट्टीवार यांनी सवदी यांना फटकारले.

वडेट्टीवार म्हणाले, प्रांतीय भाषांनुसार राज्याच्या रचना करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि कर्नाटकचा काय संबंध, एवढंही ज्याला कळत नाही, असा माणूस राज्याचा उपमुख्यमंत्री असेल तर त्या राज्याची कीव येते. बेळगावच्या लोकांची इच्छा मराठी राज्यात राहण्याची असेल तर त्यांना येऊ द्यायला हवे. शेवटी आपल्या या राज्यासाठी १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडवले आहे. त्याचा अभिमान बेळगाववासीयांना आहे. त्या मराठी लोकांच्या भावनांचा विचार करून केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये मध्यस्थी करून बेळगावला महाराष्ट्रात सामील केले पाहिजे आणि त्या वेड्या उपमुख्यमंत्र्याचाही बंदोबस्त तत्काळ केला पाहिजे.

अर्थसंकल्पाबाबत वडेट्टीवार म्हणाले, मोठ्या संकटातून आपले राज्य बाहेर आले आहे. कोरोनाचा लढा एवढा सोपा नव्हता. कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. कोरोना हद्दपार झाला नाही. अर्थसंकल्पामध्ये राज्याला मदत मिळाली पाहिजे. केंद्र सरकारच्या महाराष्ट्राविषयीच्या भावना शुद्ध नाहीत. आमच्या अपेक्षा खूप आहेत, त्या केंद्राने पूर्ण केल्या पाहिजे. कोरोनाच्या स्थितीमुळे महसूल गोळा झालेला नाही. जवळपास एक लाख कोटी रुपयांची तूट आहे. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने या बाबी लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतुदीचा समावेश असलेला अर्थसंकल्प सादर करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER