
बक्सर : बिहारच्या बक्सरमधील मंझहारी गावातील सामुदायिक विलगीकरण केंद्रात असलेला अनुप ओझा (२३) हा उपाशी राहणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना या केंद्राच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. कारण अनुपला नास्त्यात ४० पोळ्या आणि जेवणात २० प्लेट भात लागतो! अनुप कामाच्या शोधात राजस्थानला गेला होता. लॉकडाऊनमुळे काम मिळाले नाही.
परत आला तर मंझहरीच्या सामुदायिक विलगीकरण केंद्रात अडकला. अनुप केंद्रात आला आणि केंद्राचा रेशनचा ताळेबंद बिघडला! अधिकाऱ्यांनी चौकशी केली तर कर्मचाऱ्यांनी कारण सांगितले अनुपचा आहार. म्हणाले, आठ- दहा लोकांचा आहार याला एकट्यालाच लागतो. अधिकाऱ्यांचा विश्वास बसला नाही. नास्त्याच्या – जेवणाच्या वेळी केंद्रात आले. अनुपवर लक्ष ठेवले. नास्त्यात ४० पोळ्या आणि जेवणात २० प्लेट भात मोजला. केंद्रातल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, एकदा केंद्रात लिट्टी (बिट्ट्या) केल्या तर अनुपने एकट्याने ८३ खाल्या! केंद्रातील कर्मचाऱ्यांनी अनुपसाठी पोळ्या करणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यानंतर अनुपला जेवणात दोन्ही वेळा भात देण्याचे ठरले. तो अजून चार दिवस या केंद्रात राहणार आहे. अनुप उपाशी राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेश केंद्राच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. अनुपने आणि त्याच्या ओळखीच्या लोकांनी केंद्राच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याचा नेहमीचा आहार आहे. एकदा त्याने एका वेळी १०० समोसे खाल्ले होते. अनुपचे वजन ७० किलो आहे. तो सांगतो की, मी एकटा पाच – सहा लोकांचे काम करतो.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला