‘तुमचे कुटुंब तुम्हीच सांभाळा!’ वैभव पिचड यांची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वर टीका

vaibhav pichad

नगर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम म्हणजे सरकारने नागरिकांना ठामपणे सांगितले आहे की – कोरोना ही आमची जबाबदारी राहिली नाही. तुम्हीच तुमचे आरोग्य सांभाळा व तुम्हीच तुमचे कुटुंब सांभाळा, अशी टीका माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांनी राज्य सरकारवर केली आहे. ‘सरकारच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक आरोग्य धोक्यात येणार असून राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.’ असे ते म्हणाले.

वैभव पिचड आज नगरमध्ये आले होते. यावेळी सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेवर टीका करताना म्हणाले – कोरोना सुरू झाला, तेव्हा सर्वांत प्रथम त्याची जबाबदारी ग्रामीण भागात गावातील सरपंच म्हणजेच कोरोना समितीवर टाकण्यात आली. या समितीसाठी मात्र राज्य सरकारने एकही रुपयाची तरतूद केली नाही. जो काही खर्च झाला, तो ग्रामपंचायतींना स्वतःच्या उत्पन्नातून करावा लागला. आता जी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू झाली, त्यातसुद्धा सरकारने सांगितले आहे की, ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी दोन कर्मचारी नियुक्त करून त्यांचा हजार-हजार रुपये पगार हा ग्रामपंचायतीने द्यावा.

पण या सर्वेक्षण कामासाठी ग्रामपंचायतीने उत्पन्न आणायचे कुठून? गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी-पदाधिकारी वसुलीला गेले तर त्यांचे लोकांशी भांडण होते. कोरोना सुरू झाल्यापासून ग्रामपंचायतींना उत्पन्न नाही. अशा परिस्थितीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी ग्रामपंचायतींना पैसे टाकायला सांगणे योग्य नाही. ही मोहीम म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ठामपणे सांगितले आहे की, कोरोना ही आमची जबाबदारी राहिली नाही. तुम्हीच तुमचे आरोग्य सांभाळा व तुम्हीच तुमचे कुटुंब सांभाळा!

आदिवासी भागाकडे दुर्लक्ष
‘जिल्ह्यामध्ये अकोले हा एकमेव आदिवासी तालुका आहे. इथे सर्पदंशाचे रुग्ण आहेत, तर दुसरीकडे कोरोना रुग्ण आहेत; पण आरोग्याच्या बाबतीत प्रशासन, पालकमंत्री यांचे तालुक्याकडे दुर्लक्ष आहे. नगर जिल्हा राज्याच्या मध्यभागी आहे. तिथे अशी अव्यवस्था आहे तर राज्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या भागात विशेषत: गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात काय अवस्था होत असेल, असा प्रश्न पिचड यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER