‘कृषी कायदे मागे घ्या !’ शेवटची इच्छा व्यक्त करत आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या

Farmers Protest - Agriculture Laws

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याविरोधात जवळपास १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र त्यानंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. त्यातच आज (७ मार्च) आणखी एका आंदोलक शेतकऱ्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. तसेच सुसाईड नोट लिहून आपल्या मृत्यूला कृषी कायदे जबाबदार असल्याचं म्हटलं. मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण केली जाते. माझी शेवटची इच्छा कृषी कायदे मागे घ्यावे, अशी आहे. सरकारने हे कायदे मागे घ्यावेत, असंही या सुसाईड नोटमध्ये नमूद आहे.

आत्महत्या करणारा शेतकरी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील रहिवासी होता. त्यांनी टिकरी बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणापासून जवळपास सात किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ४९ वर्षीय शेतकऱ्याने कथितपणे एक सुसाईड नोट लिहिली आहे. दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन सुरूच आहे. हे आंदोलन सुरू होऊन तब्बल १०० दिवस उलटले आहेत.

बहादुरगड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी विजय कुमार म्हणाले, पीडित शेतकरी राजबीर हे हिसार जिल्ह्यातील रहिवासी होते. काही शेतकऱ्यांना या शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला लटकताना आढळून आला. त्यानंतर या शेतकऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे, माझ्या आत्महत्येच्या निर्णयाला तिन्ही कृषी कायदे जबाबदार आहेत. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेऊन माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER