बनावट पीयुसी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करा – अश्रफ खान

आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन सादर

Supreme Court

औरंंगाबाद :- उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून वाहनधारकांना मॅन्युअल पीयुसी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अश्रफ खान यांनी नुकतेच प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांना दिले आहे. बनावट पीयुसी प्रमाणपत्र देणाऱ्यामध्ये आरटीओ कार्यालयातील काही दलालासह पीयुसी सेंटर चालकांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.

आरटीओ कार्यालयात विविध कामानिमित्ताने येणाऱ्या वाहनधारकांना वाहनाच्या कागदपत्रासोबत पीयुसी प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. पीयुसी प्रमाणपत्र देण्यासाठी उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले असून त्या निर्देशाचे उल्लंघन आरटीओ कार्यालयात सक्रीय असलेल्या दलालाकडून होत असल्याचा आरोप अश्रफ खान यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने मॅन्युअल पीयुसी प्रमाणपत्र देवू नये असे आदेश दिलेले असतांना देखील काही पीयुसी सेंटरचालक वाहनधारकांकडून पैसे घेवून त्यांना मॅन्युअल पीयुसी प्रमाणपत्र देत आहेत.

दरम्यान, आरटीओ कार्यालयात सक्रीय असलेल्या काही दलालांनी जालना, बीड, परभणी, नाशिक, जळगांव आदी विविध जिल्ह्यातून कोरे पीयुसी प्रमाणपत्र आणून ठेवले आहेत. वाहनधारकांकडून अव्वाच्या-सव्वा पैसे घेवून मॅन्युअली तयार केलेले पीयुसी प्रमाणपत्र देवून वाहनधारकांची आणि शासनाची फसवणूक करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. बनावट पीयुसी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात अश्रफ खान यांनी केली आहे.