‘अधिकारी कितीही मोठा असला तरी कारवाई करा !’ पवारांचे गृहमंत्र्यांना आदेश

Sharad Pawar - Anil Deshmukh

मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यू आणि सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणाची संपूर्ण माहिती अनिल देशमुख यांनी पवारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात कुठलाही अधिकाऱ्याचा थेट संबंध येत असल्यास संबंधित अधिकाऱ्याची आधीच बदली करावी, असे स्पष्ट आदेश शरद पवारांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

त्यामुळे पुढील काळात मुंबई पोलीस विभागात काही अधिकारी बदल्या तत्काळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत विरोधकांनी जरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असला तरी तूर्तास याबाबत निर्णय घेण्यास शरद पवार अनुकूल नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत आहेत.

राज्याचे गृहमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाहेर याबाबत कितीही वावड्या उठत असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी कुठलीही चर्चा सुरू नाही. त्यामुळे गृहमंत्रिपदी अनिल देशमुखच कायम राहतील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या प्रकरणी तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीनंतर जो कोणी दोषी आढळेल त्याला योग्य ते प्रायश्चित्त  घ्यावं लागेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. या प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होत नाही. गृहमंत्र्यांनी त्यांना मिळेल तशी माहिती सभागृहात दिली आहे. गृहमंत्र्यांनी सभागृहात मांडलेली भूमिका ही त्या त्या वेळी योग्य होती. या प्रकरणात कुठल्या अधिकाऱ्याचा  सहभाग असेल तर तपास यंत्रणेनं याबाबत निष्कर्ष काढल्यानंतर बोलणं योग्य ठरेल असंही पाटील यांनी सांगितलं.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, नवाब मलिक, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत मंत्र्यांच्या कामांचा आढावा आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER