
पुणे :- कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक सूचना केल्या आहेत. कोरोनाचे नियम मोडल्यास सर्वसामान्यांवर कारवाई करण्यात येते, अशीच कारवाई महापौरांवरही करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केली आहे. ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांच्याकडे केली आहे.
अमोल कोल्हे यांनी ट्विटद्वारे महापौरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी पूर्वनियोजन कार्यक्रम पुढे ढकलले. उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेऊन कोरोनाप्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध जाहिर केले.
२१ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनीही सायंकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. असे असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपाच्या महापौरांनी ‘फॅशन शो’ कार्यक्रम आयोजित केला. त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. आणि नागरिकांचा जीव धोक्यात घातला. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग तसेच शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे महापौरांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या नेत्यांचे दौरे रद्द
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. नागरिकांची गर्दी होऊ नये व कोरोना नियमांचे पालन केले जावे यासाठी त्यांनी दौरे रद्द केले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला