बेकायदा ‘सब कॉन्ट्रक्ट’ देणार्‍या कंपन्यांवर कारवाई करा, शिवसेनेची आक्रमक भूमिका

Shivsena-BMC.jpg

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अनेक विकासकामांची कंत्राटे घेणारे कंत्राटदारनियमांना डावलून सब कॉन्ट्रक्ट देऊन काम पूर्ण करून घेतात. मुंबई महानगरपालिकेचे सर्व प्रकल्प हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लोकांंच्या हिताशी जोडलेले असतात. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदेशीरपणे सब कॉन्ट्रक्ट देऊन मुंबईकरांच्या हिताला धोका निर्माण करणार्‍या, पालिकेचे आर्थिक नुकसान करणार्‍या आणि प्रतिष्ठेशी खेळणार्‍या कंपन्यांवर कठोर कारवाई करा, अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र दिले आहे.

कोरोनाच्या संकटातही मुंबईत विकासकामे सुरू आहेत. मात्र, काही कंत्राटदार कंत्राटे मिळाल्यावर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बेकायदेशीरपणे सब कॉन्ट्रक्ट देत असतात. महानगरपालिकेत सध्या २५ टक्क्यांपर्यंत सब कॉन्ट्रक्टिंगची पद्धत आहे. मात्र, त्यासाठी महानगरपालिकेच्या पोर्टलवर तशी निविदा वाटपाच्या ३० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये निविदा वाटप केलेल्या कंपन्या बेकायदेशीरपणे त्यांना वाटप केलेल्या कामांचे सब कॉन्ट्रक्टिंग करत आहेत. एका प्रकल्पात आयटीडी सिमेंटेशन कंपनीने मिशिगन इंजिनीअरिंगला २५ टक्क्यांपेक्षा जास्त सब कॉन्ट्रक्टिंग केले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही कंपन्यांचे निविदेनंतरचे व्यवहार तपासण्यात यावेत तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली आहे.

महानगरपालिका नेहमीच निविदा प्रक्रियेदरम्यान भाग घेणार्‍या सर्व कंपन्यांच्या अधिकारपत्रांची (क्रेडेन्शिअल्स) पडताळणी करत असते. मात्र, कराराचा हक्क सांगितलेल्या कंपन्यांकडून प्रत्यक्ष गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला जात असल्यास त्याची सत्यता तपासण्याचे महानगरपालिकेकडे अद्यापपर्यंत कोणतेही योग्य धोरण नाही. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कसून चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशीत सत्यता आढळल्यास दोषी कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे आणि त्यांच्याकडून योग्य तो दंड वसूल करावा, अशी मागणीही जाधव यांनी पत्रात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER