निर्दोष ठरलेल्या तब्लिगींना मायदेशी जाण्यास मदत करा

Tablighi case- Innocent acquittal of 36 foreign accused
  • सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला सूचना

नवी दिल्ली: व्हिसाच्या अटींचा भंग करून गेल्या मार्चमध्ये दिल्लीत निजामुद्दीन मरकाज येथे तब्लिगी जमातच्या धार्मिक सम्मेलनास हजर राहणे आणि नंतर लागू झालेल्या ‘लॉकडाऊन’ (Lockdown)चे उल्लंघन करत देशाच्या विविध भागांमध्ये जाऊन इतरांना कोरोना महामारीचा संसर्ग करणे यासारख्या आरोपांवरून दाखल केल्या गेलेल्या खटल्यांमध्ये निर्दोष ठरलेल्या विदेशी नागरिकांना आपापल्या मायदेशी परत जाता यावे यासाठी केंद्र सरकारने त्यांना मदत करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केली.

दिल्लीतील न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या ३६ विदेशी ‘तब्लिगीं’नी मायदेशी जाऊ द्यावे यासाठी अर्ज केले. त्यावरील सुनावणीत न्या. अजय खानविलकर, न्या.भूषण गवई व न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने ही सूचना करताना सांगितले की, या परदेशी नागरिकांना निर्दोष ठरविणाºया खालच्या न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सरकारला अपील करायचे असेल तरी, त्यांना मायदेशी जाऊ देण्याने त्यात कोणतीही बाधा येणार नाही. न्यायालयाने समन्स काढल्यास आम्ही परत येऊ, अशी हमी जाण्यापूर्वी त्यांच्याकडून घेता येऊ शकेल.

निर्दोष ठरूनही दिल्लीत अडकून पडलेले हे विदेशी ‘तब्लिगी’ अमेरिका, रशिया, सूदान,फ्रान्स, ट्युनिशिया, श्रीलंका, तांझानिया, इंग्लंड, थायलंड, कझागस्तानव इंडोनेशिया इत्यादी देशांचे आहेत. हा विषय हाताळण्यासाठी सरकारने जे ‘नोडल अधिकारी’ नेमले आहेत त्यांच्याकडे या तब्लिगींनी विनंती अर्ज करावेतव त्या अर्जांवर त्या अधिकाºयांनी कायद्यानुसार निर्णय घ्यावा, अस न्यायालयाने लेखी आदेशात नमूद केले. अशा लोकांना काही अडचण आली तर त्यांनी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आश्वासन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पूर्वी एका प्रकरणात दिले होते. त्याचे स्मरण देत न्यायालयाने असेही सांगितले की, या लोकांनी गरज पडल्यास सॉलिसिटर जनरलच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

हे प्रकरण फक्त दिल्लीत खटला चालून निर्दोष ठरलेल्या विदेशी ‘तब्लिगीं’चे होते. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही असे खटले दाखल केले गेले होते. त्यातही शंभरहून अधिक विदेशी ‘तब्लिगी’ निर्दोष ठरले होते. आता सरकार त्या प्रत्येकाला न्यायालयात यायला लावते की, या प्रकरणावरून दिशा घेऊन स्वत:हून त्यांना मदत करते ते पाहायचे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER