598 विकेट घेतल्यावर ‘हा’ पाकिस्तानी गोलंदाज खेळतोय पहिला कसोटी सामना

गेल्या 18 वर्षांपासून तो प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class Cricket) खेळतोय, या काळात त्याने तब्बल 137 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, जवळपास सहाशे विकेट काढल्या आहेत, वय 36 च्या पुढे आहे पण अजुनही त्याला एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नव्हता पण आता अखेर 36 वर्ष 146 दिवस वय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या तब्बल 18 वर्ष 119 दिवसानंतर पाकिस्तानने (Pakistan) कसोटी पदार्पणाची (Test Debut) संधी दिली आहे आणि हा जलद गोलंदाज एवढ्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कसोटी सामना खेळतोय. झिम्बाब्वेविरुध्दच्या (Zimbabwe) हरारे येथील दुसऱ्या कसोटीसाठी त्याला संधी मिळाली आहे. हा थक्क व्हायला लावणारा प्रवास आहे पाकिस्तानी जलद गोलंदाज तबीश खानचा (Tabish Khan) जो पाकिस्तानचा गेल्या 66 वर्षातील सर्वाधिक वयाचा कसोटी पदार्पणवीर ठरला आहे.

कसोटी पदार्पणात पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत असल्याने अद्याप त्याच्या हाती नवा चेंडू यायचा आहे पण गोलंदाज म्हणून तबीशने आधीच स्वतःला सिध्द केलेले आहे. 137 प्रथम श्रेणी सामन्यात 25 पेक्षाही कमी सरासरीने थोडथोडक्या नव्हे तर तब्बल 598 विकेट त्याच्या नावावर आहेत. 58 वन डे (लिस्ट ए) सामन्यांमध्ये 73 आणि 43 वन डे सामन्यांमध्ये 42 बळी त्याच्या नावावर आहेत. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7 वेळा त्याने सामन्यात 10 किंवा अधिक गडी बाद केले आहेत आणि आता कसोटी पदार्पणात दोन जरी बळी मिळवले तर तो प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 600 बळींचा टप्पा गाठणार आहे.

एकही कसोटी सामना खेळण्याआधी 598 विकेट ही तबीश खानची कामगिरी म्हणजे आशियाई क्रिकेटपटूसाठी विक्रम आहे आणि जगात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. कसोटी पदार्पणाआधी त्याच्यापेक्षा अधिक विकेट फक्त आयर्लंडच्या टीम मुर्ताघच्या नावावर आहे. टीम मुर्ताघने आयर्लंडसाठी 2018 मध्ये कसोटी पदार्पण केले होते पण त्याआधी त्याने प्रथम श्रेणीच्या तब्बल 712 विकेट काढल्या होत्या. आशियासाठी हाच विक्रम श्रीलंकेच्या मलिंदा पुष्पकुमारच्या नावावर होता ज्याच्या नावावर 2017 मध्ये कसोटी पदार्पणाआधी 558 विकेट होत्या.

तबिश खानपेक्षाही अधिक वयात पाकिस्तानसाठी कसोटी पदार्पण करणारे दोन जण आहेत ते म्हणजे मिरान बक्ष ( 1955- 47 वर्ष 284 दिवस) आणि आमीर इलाही (1952- 44 वर्ष 45 दिवस). यापैकी आमीर इलाहीचे वैशिष्ट्य हे की याच्या पाच वर्ष आधी ते भारतासाठी कसोटी सामना खेळून चुकलेले होते.

तबीश खान 137 प्रथम श्रेणी सामने खेळल्यावर पहिला कसोटी सामना खेळतोय. याबाबतीतही खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. कसोटी पदार्पणाआधी त्याच्यापेक्षा जास्त प्रथम श्रेणी सामने फक्त खालिद अब्दुल्लाने (218) खेळले आहेत. तबीश खानच्या 137 प्रथम श्रेणी सामन्यात तीन सामने परदेशातील आहेत आणि हे तिन्ही सामने त्याने पाकिस्तान ‘अ’ साठी श्रीलंकेत खेळले होते.

तबीशने 8 जानेवारी 2003 रोजी पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्यानंतर तब्बल 18 वर्ष 119 दिवसानंतर तो कसोटी पदार्पण करतोय. एवढी दीर्घ प्रतिक्षा असणारा तो चौथा खेळाडू आहे. कसोटी पदार्पणासाठी त्याच्यापेक्षा अधिक काळ प्रतिक्षा करावे लागलेले खेळाडू असे..

1) एन. बेटनकोर्ट (वेस्ट इंडिज) – 24 वर्ष 171 दिवस
2) इ. आर. विल्सन (इंग्लंड) – 21 वर्ष 291 दिवस
3) एड जाॕयस (आयर्लंड)- 20 वर्ष 275 दिवस
4) डब्ल्यू. इ. एस्टील (इंग्लंड)- 21 वर्ष 124 दिवस
5) तबीश खान (पाकिस्तान)- 18 वर्ष 119 दिवस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button