टी-20 नंतर आता मूळ धरतेय टी-10 क्रिकेट, ऑलिम्पिकसाठी योग्य असल्याचा दावा

क्रिकेटचा (Cricket) ऑलिम्पिकमध्ये (Olympic) समावेश व्हायचा असेल तर या खेळाचे लघू रुप वा,आटोपशीर सामने असायला हवेत याबद्दल बहुमत आहे. या दृष्टीने टी-20 (t-20 cricket) सामनेसुध्दा जरा मोठेच वाटतात म्हणून टी-10 (T-10 cricket) क्रिकेटची चर्चा सुरू आहे. कुमार संघकारासारख्या (Kumar Sanghakara) अनुभवी खेळाडूनेही ऑलिम्पिकसाठी टी-10 क्रिकेट हाच उत्तम पर्याय असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर अबूधाबीत टी-10 लीग स्पर्धेला सुरूवात झाली आहे. एकप्रकारे ऑलिम्पिकचा विचार करता टी- 10 क्रिकेट योग्य आहे की नाही याची एकप्रकारे चाचणीच यानिमित्ताने होणार आहे.

अबुधाबी टी-10 ला गुरुवारी सुरुवात झाली. या स्पर्धेत 10 दिवसात 29 सामने खेळले जाणार आहेत. आठ संघांदरम्यान दोन गटात सामने सुरू आहेत. त्यात पूणे डेव्हिल्स, क्वालांडर्स, मराठा अलोबियन्स, दिल्ली बुल्स, डेक्कन ग्लॕडिएटर्स, टीम अबू धाबी, बांगला टायगर्स आणि नादर्न वाॕरियर्स यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी दिल्ली बुल्स, पुणे डेव्हिल्स आणि मराठा अरेबियन्सने आपआपले सामने जिंकले आहेत. अबूधाबी टी-10 लीगचे हे चौथे वर्ष असून त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक असतात. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाच्या हालचाली सुरू असल्याने यंदाच्या या स्पर्धेला वेगळे महत्त्व आहे.

ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी यांच्यासह टाॕम बँटन, मुजीब उर रहमान, चॕडविक वाॕल्टन आणि इम्रान ताहीरसारखे खेळाडू यात खेळणार आहेत. भारतीय खेळाडूंपैकी दिग्गज प्रवीण तांबेसह चार खेळाडू आहेत तर लालचंद राजपूत व राॕबिन सिंग हे संघप्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेय की, क्रिकेटचे हे रुप, त्याची आकर्षकता, त्याच्या क्षमता आम्हाला जगासमोर आणायच्या आहेत. क्रिकेटचा हा प्रकार वाढवून ऑलिम्पिकसारख्या बहुविध खेळांच्या स्पर्धांसाठी क्रिकेटची संयुक्तिकता सिध्द करायची आहे. साधारण एक अब्ज लोक ह्याचे सामने टेलिव्हिजनवर पाहतील असा अंदाज आहे. 2017 मध्ये टी-10 क्रिकेट सुरु झाल्यापासून ही मोठी झेप आहे.

पहिल्याच स्पर्धेवेळी 2017 मध्ये इंग्लंडमध्ये इयान माॕर्गन याने क्रिकेटचा हा प्रकार ऑलिम्पिकसाठी योग्य असल्याचे मत मांडले होते. त्यांनंतरआता ख्रिस गेल व कुमार संघकारा यांनी तसेच मत मांडले आहे. त्यामुळे 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाच्या मागणीने जोर पकडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER