स्वायटेकने उडवला प्लिस्कोव्हाचा धुव्वा, जिंकू दिला नाही एकही गेम

Iga Swiatek

पोलंडच्या इगा स्वायटेक (Iga Swiatek, Poland) हिने रोम ओपन विजेतेपदासाठी टॉप टेनमधील खेळाडू कॅ रोलिना प्लिस्कोव्हाचा 6-0,6-0 असा अक्षरशः धुव्वा उडवला आणि स्वतः पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये स्थान मिळवले. इटालियन ओपनच्या (Italian Open) इतिहासातील हा सर्वात एकतर्फी सामना फक्त 46 मिनिटात आटोपला. त्यात इगाने पहिल्या सेटमध्ये चार आणि दुसऱ्या सेटमध्ये नऊ असे फक्त 13 गूण गमावले. इगाचे हे तिसरे विजेतेपद आहे. याच्याआधी तिने गेल्या वर्षीची फ्रेंच ओपन आणि यंदाची अॕडिलेड ओपन या स्पर्धा जिंकल्या आहेत.

रोमच्या विजेतेपदासाठी एकही गेम न गमावलेली ती पहिलीच खेळाडू ठरली. याच्याआधी 1983 मध्ये आंद्रिया तेमेस्वारी हिने बोनी गादुसेक हिला 6-1, 6-0 अशी मात दिली होती. आणि महिलांच्या टेनिस स्पर्धात याच्याआधीची शेवटची 6-0, 6-0 अशी विजेतेपदाची लढत 2016 मधील होती. त्यावेळी बुखारेस्ट येथे सिमोना हालेप हिने अॕनास्तेशिया सेवास्तोव्हा हिला एकही गेम घेऊ दिला नव्हता.

या विजयानंतर स्वायटेक म्हणाली की जेंव्हा मला प्रशिक्षकांनी सांगितले की तू 6-0, 6-0 अशी जिंकली आहेस त्यावेळी मी विचारले..खरंच! तुमची काही गल्लत तर होत नाहीये ना? या सामन्यादरम्यान विश्रांतीच्या वेळी मी प्रत्येकवेळी सामना सुरुवातीपासून खेळायचाय याच विचाराने खेळले. पहिला सेट 6-0 असा जिंकला हे माझ्या लक्षातसुध्दा आले नाही. स्कोअर काययाची चिंता न करता फक्त खेळायचे हेच धोरण महत्त्वाचे ठरले. स्कोअरचा विचार केला तर मनस्थिती खराब होते.

46 मिनिटात संपलेला हा सामना 2009 नंतर सर्वात झटपट आटोपलेला महिला टेनिसचा अंतिम सामना ठरला. 2009 मध्ये इस्तंबूलच्या विजेतेपदासाठी व्हेरा दुशेविना हिने ल्युसी रादेका हिचा फक्त 42 मिनिटातच 6-0, 6-1 असा पराभव केला होता.

महिला टेनिसमध्ये सन 2000 नंतर एकही गेम न गमावता जिंकलेले अंतिम फेरीचे सामने

2006 – क्युबेक सिटी- मारियान बार्टोली वि. वि. ओल्गा पुचकोव्हा
2013 – सिडनी- अॕग्नियेस्का राद्वांस्का वि.वि. डाॕमिनिका सिबुलकोव्हा
2016- बुखारेस्ट- सिमोना हालेप वि. वि. अॕनास्तेशिया सेवास्तोव्हा
2021- रोम- इगा स्वायटेक वि.वि. कॕरोलिना प्लिस्कोव्हा

या चारपैकी स्वायटेक व राद्वांस्का या दोन्ही पोलंडच्या खेळाडू आहेत. स्वायटेकने पहिल्यांदाच सामना 6-0, 6-0 असा जिंकला आहे तर कॕरोलिना प्लिस्कोव्हावर दुसऱ्यांदा अशा दारुण पराभवाची नामुष्की ओढावली आहे. याच्याआधी 2009 मध्ये लॕटिना आयटीएफ स्पर्धेत ती अॕना कोर्जेनियाक हिच्याकडून 6-0, 6-0 अशी पराभूत झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button