घामोळे / पुरळं – उन्हाळ्यात काळजी घेणे महत्त्वाचे !

Sweat - Acne - Summer

तापमान वाढायला लागले की अति घाम, उष्णता यामुळे घामोळ्याचा त्रास सुरु होतो. लहान मुलांना तर अगदी हैराण करणारा ठरतो. कितीही पावडर बदलल्या तरीही खाज, उष्णता, दाह कमी होत नाही. ऋतुनुसार आहार विहारात परिवर्तन करणे अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात घेतले की घामोळ्यांचा त्रासापासून दूर राहणे शक्य आहे. घामोळे (Swaet) हा विकार वातावरणातील उष्मा वाढल्यामुळे होत असतो. या उष्म्याला अनुसरून वस्त्र, आहारबदल करणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात (Summer) सुती सैलसर कपडे वापरावे जेणेकरून घाम शोषला जाईल. कृत्रिम धाग्यांनी बनलेल्या कपड्यांमुळे घाम शोषला जात नाही जीन्स सारख्या जाड कपड्यामुळे उष्णता अधिक वाढते त्यामुळे घामाचे प्रमाण वाढून त्वचेवर घामोळ्या पुरळं (Acne) तसेच चट्टे येण्यास सुरवात होते. म्हणूनच सुती सैल कपडे उन्हाळ्यात घालणे गरजेचे आहे.

आहारात गरम मसाले, क्षोभ करणारे पदार्थ यांचे प्रमाण कमी करावे जेणेकरून शरीरातील उष्णता वाढणार नाही.

सिद्धजल घेणे – धण्याचे पाणी शरीरातील उष्णता कमी करणारे आहे ते दिवसातून १- २ घेऊ शकतो. याशिवाय गुलकंद, मोरावळा, वाळा घातलेले पाणी, गुलाबाचे सरबत, कोकम सरबत नारळपाणी हे देखील शरीरातील उष्णता कमी करण्याकरीता खूप फायदेशीर ठरतात.

पुरळं येण्याची ज्यांना वारंवार खोड असेल त्यानी त्रिफळा चूर्ण रात्री झोपतांना घेतल्यास फायदा होतो.

बाह्य उपचार – घामोळ्यांवर लेप लावणे खूप आराम देणारे आहे. चंदन उगाळून लावणे, जांभूळबी वाटून लावणे, कडूलिंब रस लावणे, स्नान करतांना वाळा नागरमोथा पाण्यात टाकणे. कडूलिंबाची पाने वाटून स्नानाच्या पाण्यात घालणे. हे सर्व उपाय त्वचेची रंध्रे स्वच्छ करतात. ही द्रव्ये उष्णता कमी करतात त्वचाविकार नष्ट करतात.

अनंतमूळ, गुळवेल सत्त्व, प्रवाळ पिष्टी, रक्तशुध्दिकर औषधे तसेच पित्तशामक औषधे वैद्याच्या सल्ल्याने घ्यावीत.

खूप उन्हात फिरणे, कोंदट हवेत राहणे, जागरण, पंख्याखाली झोपणे, कृत्रिम रासायनिक थंड पेय, मसालेदार पदार्थ अतिव्यायाम टाळावा.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER