
गेल्या काही महिन्यांपासून सेलिब्रिटी कलाकारांचे सोशल मीडिया पेज हॅक करायचे आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करायची अशा पद्धतीची फसवणूक जोरात सुरू आहे. काही कलाकार याला बळी पडले आहेत तर काही कलाकारांनी मात्र शहाणपणाचे पाऊल उचलून त्यापासून स्वतःचा बचाव करून घेतला. असाच अनुभव अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) यालाही आला. अशा प्रकारच्या कुठल्याही ऑनलाईन फसवणुकीला प्रतिसाद देण्यापूर्वी थोडा विचार करा, असा अनुभवाचा सल्लादेखील त्याने दिला आहे. स्वप्नीलने स्वतः व्हिडीओ शेअर करून तसेच या अनुषंगाने स्वप्नील आणि हॅकरमध्ये झालेल्या संभाषणाचे स्क्रीन शॉटदेखील शेअर केले आहेत. स्वप्नीलच्या या अनुभवावरून शहाणे होत त्याच्या अनेक सेलिब्रिटी मित्र-मैत्रिणींनीदेखील कानाला खडा लावला आहे अशी प्रतिक्रिया त्याला दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी स्वप्नील जोशी याला एक फोन आला आणि त्या संबंधित व्यक्तीने असं सांगितलं की, तुम्ही तुमच्या इन्स्टा पेजवर काही पोस्ट करत असताना कॉपीराइट नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई केली जाईल. मात्र तुम्हाला जर कारवाईतून मुक्त व्हायचे असेल तर आम्ही तुम्हाला तुमचे सोशल मीडिया अकाउंट नव्याने ओपन करून देऊ. त्यासाठी तुमचा पासवर्ड आणि युजरनेम आम्हाला द्या. खरे तर सुरुवातीला या फोनवरून आलेला कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप स्वप्नीलला खरा वाटला. स्वप्नील सांगतो, आपण अनेकदा काही फॉरवर्ड झालेले मेसेज किंवा फोटो आपल्याला आवडले म्हणून आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. ते करत असताना आपल्याला कधी ही गोष्ट लक्षात येत नाही की त्यातून कॉपीराइट नियमाचा भंग होऊ शकतो. त्यामुळे मला सुरुवातीला माझ्याकडून अनवधानाने एखादा फोटो फॉरवर्ड केला असेल आणि त्यामुळे कॉपीराइट कायद्याचा भंग झाला असेल असं वाटलं. त्यामुळे मीदेखील त्यांच्या भूलथापांना बळी पडण्याची शक्यता सुरू झाली होती. शिवाय त्यांनी मला पाठवलेला कॉपीराइटचा भंग केल्याबाबतचा मेसेज अत्यंत कायदेशीर भाषेमध्ये लिहिला असल्यामुळे पहिल्यांदा मला भीतीही वाटली. याबाबत मी तातडीने माझ्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्या टीमला माहिती दिली, आणि मी माझ्या कामाला लागलो. मात्र यानंतरदेखील त्याला सातत्याने पासवर्ड आणि युजरनेमबद्दल विचारणा करणारे फोन येणे सुरूच राहिले तर दुसरीकडे त्याची सोशल मीडिया टीम याबाबत काय करता येईल याचा विचार करत होती. त्याच क्षणी स्वप्नीलच्या मनात असाही विचार आला की, हे काही तरी चुकत आहे. अशा पद्धतीने सतत एखादी व्यक्ती तुमचा पासवर्ड आणि युजरनेम मागत असेल तर त्यामध्ये काही तरी काळेबेरे असू शकते, या विचाराने स्वप्नीलने त्याच्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्या टीमशी चर्चा केली आणि जेव्हा पुन्हा स्वप्नीलला पासवर्ड मागण्यासाठी फोन आला तेव्हा त्याने त्याचा कठोर भाषेत आणि जाब विचारणाऱ्या शब्दांमध्ये समाचार घेतल्यानंतर स्वप्नीलला फोन येणं बंद झालं. जेव्हा स्वप्नीलला सांगितलं की, तुम्ही कॉपीराइटचा भंग केल्यामुळे तुमचं इन्स्टा अकाउंट बंद करण्यात येईल आणि तुम्हाला दुसरं अकाउंट उघडावे लागेल त्या वेळेला खरे तर स्वप्नील याच गोष्टीमुळे दुसरे अकाउंट ओपन करण्यासाठी पासवर्ड आणि युजरनेम देण्याच्या तयारीत होता आणि ते कारण होतं की, त्याचे दहा लाखांहून जास्त फॉलोअर आहेत. एखाद्या कलाकारासाठी त्याचे फॉलोवर्स सोशल मीडिया पेजवर जास्तीत जास्त असणे हे त्याच्या पब्लिसिटीसाठी गरजेचं असतं.
स्वप्नीलनेदेखील खूप मेहनतीने हे फॉलोवर्स कमावले आहेत, जेणेकरून त्याला त्याच्या नव्या भूमिकांविषयी नव्या प्रोजेक्टविषयी त्यांच्याशी संवाद साधता येईल. जेव्हा नवीन अकाउंट उघडावे लागेल हा पर्याय या सगळ्या परिस्थितीतून पुढे आला तेव्हा त्याला सुरुवातीला असे वाटले की, हे सगळं करत असताना पुन्हा एकदा नवे फॉलोअर करावे लागतील आणि आता त्यात खूप वेळ जाईल. पण पुढच्याच क्षणी त्याला या फसवणुकीची चाहूल लागली आणि त्याचे खरे चाहते असतील ते पुन्हा त्याला नव्याने फॉलो करतील यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. शेवटी हॅकर्सनी स्वप्नीलचा नाद सोडून दिला आणि स्वप्नील ऑनलाईन फसवणूक होण्यापासून वाचला. स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याने स्वतः ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहचवली.
दोन महिन्यांपूर्वी ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतील नायिका अमृता धोंगडेचे इन्स्टा अकाउंट हॅक करून ते पुन्हा सुरू करण्यासाठी तिच्याकडे ४० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत कुठलीही शहानिशा न करता अमृताने पैसे दिल्याने तिला आर्थिक फटका बसला होता. मात्र जेव्हा ही चूक तिच्या लक्षात आली तेव्हा तिनेदेखील लोकांना अशा पद्धतीच्या फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले होते. गेल्या आठवड्यात बिग बॉस शोचा विजेता शिव ठाकरे यांच्या नावानेदेखील फेसबुकवर फेक अकाउंट ओपन करून काही मुलींना चुकीचे मेसेज केल्याचे त्याला त्याच्या मित्रांकडून कळलं. त्याविरोधातदेखील शिवने खास व्हिडीओ बनवून फेक अकाउंटचा शिव ठाकरे मी नसून त्याला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केलं होतं. स्वप्नीलच्या बाबतीत घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा सेलिब्रिटी कलाकारांना, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या हॅकर्सनी लक्ष्य करत असल्याची समस्या इंडस्ट्रीमध्ये निर्माण झाली आहे.
ह्या बातम्या पण वाचा :
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला