स्वप्निल जोशीही उतरला व्यवसायात, खास महिलांसाठी सुरु केला ‘आत्मसन्मान’ उपक्रम

बॉलिवू़डचे कलाकार सिनेमात काम करता करताच वेगवेगळ्या उद्योगात उतरून भविष्याची तरतूद करून ठेवतात. मराठी कलाकार मात्र अभिनयाव्यतिरिक्त दुसरा कुठला उद्योग सुरु करण्याच्या मागे लागत नाही. अर्थात यात आर्थिक बाबही महत्वाची असते. मात्र स्वप्निल जोशीने (Swapnil Joshi) व्यवसायात उतरत एक उदाहरण सादर केले आहे. राज्यातील महिलांना स्वयंरोजगार देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी स्वप्निलने आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त ‘आत्मसन्मान’ ही ई कॉमर्स योजना सुरु केली असून ही योजना ‘व्होकल फॉर लोकल’ (Vocal for Local) संकल्पनेवर आधारित आहे. स्वप्निल जोशीसोबत तृप्ती पाटील आणि मंजुषा पैठणकर यांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरु केला आहे.

स्वप्निल जोशी आणि तृप्ती पाटील ‘शॉप विथ ती’ चालवत होते. त्यांच्याशी आता मंजुषा पैठणकर जोडल्या गेल्या आहेत. महिलांना व्यापार करण्यास, उद्योजक बनण्यास आणि त्या अगोदरच व्यापार-उदीम करीत असतील तर त्यांना नवी भरारी देण्यासाठी हा उप्रक्रम सुरु करण्यात आला आहे. ज्या महिलांना स्वतःची उत्पादने विकायची आहेत, किंवा ज्यांच्याकडे तशी उत्पादने नाहीत, पण व्यापार मात्र करायचा आहे, त्यांच्यासाठी हे एक आदर्श ऑनलाईन पणन व्यासपीठ आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे भागभांडवल नाही, त्यांना ते मिळवून देण्याची जबाबदारीसुद्धा ‘आत्मसन्मान’ घेणार आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना स्वप्निल जोशीने सांगितले, “आमच्या “शॉप विथ ती’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता श्रीमती मंजुषा पैठणकर आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन यांच्या माध्यमातून आम्ही ‘शॉप विथ ती’ला एका नव्या ऊंचीवर घेवून जाऊ. उद्योजक महिलांनी त्यांची केवायसी कागदपत्रे, उद्योग आधार, जीएसटी क्रमांक, एफएसएसएआय परवाना आणि उत्पादनाशी संबंधित इतर गोष्टी व्यवस्थापनाला पुरवणे आवश्यक आहे. पैशांच्या व्यवहारांसाठी ‘आत्मसन्मान’ला उद्योजिकेच्या बँकेचे तपशीलसुद्धा अपेक्षित आहेत. सध्या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क ठेवण्यात आलेले नसल्याची माहितीही स्वप्निलने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER