स्वप्नील गौरीचं मैत्रीतलं नाव

gauri-nalawade

सेलिब्रिटी कलाकारांच्या मैत्रीचे किस्से आपण अनेकदा ऐकतो. सिनेमा, मालिका, नाटक या क्षेत्रात सहकलाकार म्हणून एकत्र येतात आणि त्यांच्या मैत्रीची भट्टीही छान जमते असे खूप कलाकार इंडस्ट्रीमध्ये आहेत. कधी कधी असं होतं की अभिनयाचं शिक्षण घेताना ते एकाच अकादमीमध्ये शिकत असतात तेव्हापासूनची मैत्री असते. तर रंगभूमीतून सिनेमा, मालिकांकडे वळलेल्या कलाकारांनी एकत्र हौशी रंगभूमीवर, किंवा महाविद्यालयीन एकांकिकेचा मंच शेअर केलेला असतो. कलाकारांची मैत्री हा चाहत्यांमध्ये उत्सुकतेचा विषय असतो. गंमत म्हणजे, एकमेकांचे मित्र किंवा मैत्रीण असलेले कलाकार एकमेकांना वेगळ्याच नावाने हाक मारत असतात. या टोपणनावाचे किस्सेही इंडस्ट्रीत रंगत असतात. असाच एक किस्सा अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि अभिनेत्री गौरी नलावडे (Gauri Nalawade) यांनी शेअर केला. चाहत्यांना जेव्हा त्यांनी सांगितलं ही आम्ही दोघं एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतो ते ऐकल्यावर त्यांच्या फॅन्सनीही दाद दिली.

स्वप्नील आणि गौरी यांनी एकत्र फ्रेंडस या सिनेमात काम केले आहे. सिनेमा आणि मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये स्वप्नील आणि गौरीच्या अभिनयाचे चाहते आहेत. सहकलाकार म्हणून काम करत असताना या दोघांच्याही मैत्रीचे सूर छान जुळले आणि आजही त्यांची मैत्री टिकून आहे. एका रेडिओचॅनलच्या निमित्ताने स्वप्नील आणि गौरी एकाच मंचावर आले. खरंतर ही चर्चा होती गौरीच्या आयुष्यातील एक असा प्रसंग शेअर करण्याची ज्यातून तिचा आणि तिच्या मैत्रिणीचा संवाद कसा आहे. गौरीने तिच्या मैत्रिणीसोबत घडलेल्या एका प्रसंगात तिने कशी मदत केली हे तर सांगितलेच. पण निमित्त मैत्रीचं सुरू असताना स्वप्नील आणि गौरीला त्यांच्या दोघांच्या मैत्रीविषयी सांगण्याचा मोह आवरला नाही.

स्वप्नील सांगतो, आम्ही फ्रेंडस या सिनेमाच्या निमित्ताने भेटलो. याचवेळी आम्हाला असं कळलं की आम्ही खूप चांगले मित्रमैत्रीण झालो आहोत. सुरूवातीला मी गौरीला गौरी अशीच हाक मारायचो आणि ती मला स्वप्नील म्हणायची. गौरी इतकी नाजूक आहे ना की तिच्या बोलण्यात, वावरण्यात तो नाजूकपणा दिसतो. तिच्या सहज हालचालीसुद्धा खूप नाजूक आहेत. पण माणूस कितीही नाजूक असला तरी तो त्याच्या नैसर्गिक क्रिया नाजूकपणे करत नाही असा माझा एक समज होता. म्हणजे माणसाला शिंक आली तर तो उत्स्फूर्तपणे देतो. आळस द्यायचा झाला तर अगदी दोन्ही हात पसरून आळस देतो. पण गौरीचं तसं नाहीय. तिला कितीही मोठा आळस द्यायचा झाला तरी ती हात न पसरवता अगदी खांद्यापर्यंत हात नेत आळस देते. बर हे ती मुद्दाम करत नाही हे तिच्याकडे पाहिलं की लगेच कळतं. गौरीचं हे असं मोठा आळसदेखील छोटाशा रूपात देण्याची पद्धत मी सिनेमाच्या शूटिंगवेळी पहायचो. तेव्हापासून मी गौरीला मोठा आळस अशीच हाक मारतो. आता तिलाही माझ्याकडून ही हाक ऐकायची इतकी सवय झाली आहे की मी जर तिला गौरी अशी हाक मारली तर ती मला ओ असं म्हणेल की नाही याची खात्री नाही.

गौरीनेही मग स्वप्नीलसोबतच्या मैत्रीला आणि त्यांच्यातील वेगळ्या नावांचा किस्सा शेअर केला. गौरी म्हणाली, असं म्हणतात की गोरेपणा मुलींमध्ये जास्त दिसतो. मुलं कितीही गोरी असली तरी त्यांचा गौरवर्ण जाणवत नाही. स्वप्नीलला भेटण्यापर्यंत माझा तरी हाच अनुभव होता. पण सिनेमाच्या निमित्ताने आम्ही भेटलो तेव्हा स्वप्नीलला पाहिलं आणि मला जाणवलं की तो खूपच गोरा आहे. आणि गोराच नव्हे तर त्याच्या गालावर गुलाबी झाक आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा गोरेपणा खूप नॅचरल आहे. आजपर्यंत मी त्याच्याइतका गोरा मुलगाच पाहिला नाही. आम्ही मैत्रीने खूप जवळ आलो आणि त्याने जेव्हा मला मोठा आळस असं नाव ठेवलं तेव्हा मला वाटलं की स्वप्नीललाही मी काहीतरी वेगळ्या नावाने बोलवलं पाहिजे. असं नाव की जे फक्त आम्हा दोघांनाच माहिती असेल. मग मला सुचलं आणि मी त्याला तेव्हापासून गोरा पिंक असं म्हणते.

स्वप्नील आणि गौरी जेव्हा जेव्हा एकमेकांना भेटतात, फोनवर बोलतात, चॅटिंग करतात तेव्हा स्वप्नील गौरीला मोठा आळस असंच बोलवतो आणि गौरी त्याला गोरा पिंक असं म्हणते. या दोघांच्या मैत्रीतला हा खुशखुशीतपणा त्यांच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER