स्वानंदीला सापडला सूर

Swanandi titkera

गेल्या दोन महिन्यांपासून छोट्या पडद्यावर चर्चा होती ती तुफान गाजत असलेल्या सिंगिंग स्टार… गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे रियलिटी शो मध्ये जिंकणार कोण? कारण प्रत्येक सेलिब्रिटी कलाकार हा छान गात होता. छान स्पर्धा सुरू होती .त्यामुळे यामध्ये बाजी कोण मारणार या प्रश्नाचे उत्तर स्वानंदी टिकेकर या नावापाशी येऊन थांबलं. अभिनेते उदय टिकेकर आणि प्रख्यात गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची कन्या असल्याने अभिनय आणि गायन या दोन्हीचा वारसा घेऊन आलेल्या स्वानंदीला या शोच्या निमित्ताने गाण्याचा सूर सापडला.

दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती दोबारा या दोन मालिकांमुळे स्वानंदी टिकेकर हे नाव छोट्या पडद्यावर स्थिरावले. शिवाय स्वानंदी ने अनेक नाटकात देखील काम केले आहे शिवाय ती एकांकिका आणि प्रायोगिक रंगभूमीशी देखील जोडली गेलेली आहे. पुणेकर स्वानंदीवर लहानपणापासूनच अभिनय आणि गायन या दोन्ही संस्कार झाले आहेत. स्वानंदीने कायद्याचे शिक्षण घेतले असल्याने ती पेशाने वकील आहे. पण ती कोणत्या क्षेत्रांमध्ये करिअर करणार हे मात्र काही अजून स्पष्ट झालेलं नव्हतं कारण ती अभिनय आणि गायन या दोन्ही व्यासपीठावर स्वतःचे बेस्ट देत होती.

ती सांगते , तीन महिन्यापुर्वी जेव्हा सिंगिंग स्टार या शोची ऑफर आली तेव्हा खरे तर खूप दडपण आलं होतं. एक तर प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी असल्याने या शोमध्ये मला चांगलंच गावे लागणार याची जाणीव मला होती. शिवाय अशा प्रकारची संकल्पना असलेला हा माझ्यासाठी पहिलाच शो होता. मात्र गाण्याविषयी म्हणाल तर मी लहानपणापासून गाणे ऐकत मोठी झाली आहे. मी आई कडून शिकले देखील आहे. पण आत्तापर्यंत कधी गायनातच करिअर करायचं असं मी ठरवलं नव्हतं. कारण मला अभिनयाचीही तितकीच आवड आहे.

कोणतेही गाणं प्रभावी व्हायचे असेल तर त्या गाण्यातले बोल त्या गाण्याचा बाज, त्या गाण्यातले भाव हे सुरांमधून व्यक्त झाले पाहिजेत आणि त्यासाठी अभिनयाची जोड देखील तितकाच महत्त्वाची आहे याचीही मला जाणीव या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली. या शोमध्ये मी लावणी, रागदारी गाणं, उडत्या चालीचे गाणं, गंभीर गाणं अशा अनेक प्रकारची गाणी ट्राय केली आणि त्याचमुळे त्या गाण्यातून व्यक्त होण्यासाठी मला माझ्या अभिनयाचं कौशल्य देखील वापरता आले याचा मला विशेष आनंद होतो. सिंगिंग स्टार या शोमध्ये स्वानंदी टिकेकर विजेती झाल्याची घोषणा करताच अभिनेते उदय टिकेकर यांनी लेकीला घट्ट मिठी मारून हा आनंदाचा क्षण साजरा केला. तर आरती अंकलीकर यांनाही खूप आनंद झाला. आरती या शास्त्रीय गायनमध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत असल्यामुळे सगळ्यांची नजर देखील स्वानंदीच्या गाण्याकडे लागून राहिली होती.

या सगळ्यांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करत स्वानंदीने बाजी मारली. स्वानंदीसोबत रोहित राऊत तिच्या या स्पर्धेमध्ये मेंटर आणि सह गायक म्हणून सहभागी झाला होता. या दोघांनी या स्पर्धेमध्ये प्रचंड धमाल केली. यानिमित्ताने स्वानंदी ने गाण्याच्या निवडीपासून ते तालमी पर्यंत अनेक आठवणी, धमाल किस्से देखील शेअर केले. एक गाणं गाण्यासाठी रोहित आणि माझी केमिस्ट्री जुळावी यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि या निमित्ताने त्या सगळ्या प्रयत्नांचे चीज झाल्याचेही स्वानंदी सांगते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER