बलात्काराच्या खटल्यात स्वामी चिन्मयानंद निर्दोष

Swami Chinmayananda Innocent in rape case

शाहजहांपुर (उ.प्र.): विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून दाखल केलेल्या खटल्यात येथील सत्र न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यासह सर्व आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.

लोकप्रतिनिधींवरील फौजदारी खटल्यांसाठीच्या विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. के. रॉय यांनी, आरोपींविरुद्धचे कोणतेही आरोप सिद्ध करण्यास अभियोग पक्ष नि:संदिग्ध पुरावा सादर करू न शकल्याने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे, असे जाहीर केले. अभियोग पक्षाने उभे केलेले सर्वच साक्षीदार उलटले होते व खुद्द फिर्यादी मुलीनेही साक्ष देताना जबानी फिरविली होती. त्यामुळे आरोपींचे निर्दोष सुटणे अपेक्षितच होते.

याच खटल्याची उपपत्ती म्हणून ही फिर्यादी विद्यार्थिनी व  संजय सिंह, डीपीएस राठोड, विक्रम सिंह, सचिन सिंह व अजित सिंग यांच्यावर स्वामी चिन्मयानंद यांच्याकडे पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्याचा खटला दाखल केला गेला होता. न्यायाधीश रॉय यांनी त्या खटल्यातही सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.

चिन्मयानंद यांच्याविरुद्ध आरोप करणारी विद्यार्थिनी त्यांच्याच आश्रमातर्फे चालविल्या जाणाºया विधी महाविद्यालयात ‘एलएल. एम.’च्या अभ्यासक्रमात शिकत होती व तेथील वसतिगृहात राहात होती. ऑगस्ट, २०१९ मध्ये तिच्या वडिलांनी हॉस्टेलच्या खोलीत डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याची फिर्याद पोलिसांत नोंदवली. विद्यार्थिनीच्या फेसबूक अकाऊंटवरील माहितीच्या आधारे वडिलांनी ही फिर्याद नोंदवली होती. २० सप्टेंबर, २०१९ रोजी स्वामी चिन्मयानंद यांना अटक झाली व नंतर ते जामिनावर सुटले. नोव्हेंबर , २०१९ मध्ये त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले गेले होते.

विद्यार्थिनीच्या वडिलांनी ही फिर्याद नोंदविण्याच्या दोन दिवस आधी ती विद्यार्थिनी व तिच्या मित्रांविरुद्ध चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याची फिर्याद नोंदली गेली होती.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER