स्वाभिमानीची ऑनलाइन ऊस परिषद सुरू

स्वाभिमानी शेतकरी संघटना - ऑनलाइन ऊस परिषद

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची (Swabhimani Shetkari Sanghatana) १९ वी ऊस परिषद आज (ता. २) दुपारी दोन वाजता जयसिंगपूर-उदगाव मार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये ऑनलाईन सुरू झाली आहे. एफआरपी अधिक १४ टक्के रक्कम द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनाची रणनीती या वेळी आखली जाणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी परिषदेत आंदोलनाची घोषणा आणि दराची मागणी करणार असल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष या परिषदेकडे आहे. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष सावकार मादनाईक, शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.

शनिवारी कोल्हापूरात साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यात शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात एकरकमी एफआरपी देणार असल्याची घोषणा साखर कारखानदारांनी केली. मात्र, तोडणी मजुरांच्या मजुरीत केलेली १४ टक्के दरवाढ शेतकऱ्यांच्याच ‘एफआरपी’मधून दिली जाणार आहे. त्यामुळे यंदा कारखानदारांनी एफआरपी अधिक १४ टक्के रक्कम द्यावी, या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे.

दरवर्षी हजारो ऊस उत्पादकांच्या उपस्थितीत होणारी ऊस परिषद यंदा मोजक्‍याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सुरू झाली. परिषदेचे सोशल मीडियावरून प्रसारण करण्यात आले आहे. ॲपद्वारे शेतकरी व कार्यकर्त्यांना लिंक शेअर करण्यात आली असू शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER