सचिन तेंडूलकर यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचे आंदोलन

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंबंधी ट्विट करणाऱ्या भारतरत्न व प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. संघटनेचे युवा प्रवक्ते रणजित बागल यांनी हातामध्ये फलक घेऊन ‘‘सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील ?’असा सवाल केला. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत त्यांनी सचिनचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. घोषणाबाजी नाही, निदर्शने नाहीत. शांततेच्या मार्गाने हाती फलक घेऊन भूमिका मांडली.

दिल्लीमध्ये गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्राने तीनही कृषी कायदे रद्द करावेत यासाठी शेतकरी तळ ठोकून आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला जोरदार विरोध केला. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषी कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी दौरे करुन शेतकऱ्यांत जागृती करत आहेत. आंदोलनात सहभागी होत आहेत.

कृषी कायद्याविरोधात ‘स्वाभिमानी’ वेगवेगळया टप्प्यावर आंदोलन करत आहे. संघटनेचे युवा प्रवक्ते रणजित बागल हे सोमवारी मुंबईत पोहचले. ते मूळचे पंढरपूर येथील आहेत. सध्या एफवायला शिकत आहे. गेल्या सहा ते सात वर्षापासून संघटनेचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. सचिन तेंडूलकर यांच्या घरासमोरील या शांततामय आंदोलन करण्याच्या भूमिकेसंदर्भात रणजित बागल यांच्याशी मोबाइलवरुन संपर्क साधला. रणजित म्हणाला, ‘भारतरत्न व प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. त्यांचा मी फॅन आहे. शांततेच्या मार्गाने हाती फलक घेऊन माझी भूमिका मांडली. कोणतीही घोषणा दिली नाही. निदर्शने नाहीत. सचिन भारतरत्न आहेत,त्यांच्याविषयी आदर आहे. त्याचबरोबर शेतकरी उन्हातान्हात कष्ट करुन शेतातून मोती पिकवत असतात. त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी, दिवसबर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याविषयी त्यांनी सदैव कृतज्ञतेचा भाव व्यक्त करावा हे सांगण्यासाठी मी मुंबईला गेला होतो.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER