
औरंगाबाद :- स्वाभिमानी शेतकरी संघटना ही ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नावर लढणारी असली तरी शहरातील नागरिकांचे आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा व भ्रष्टाचारमुक्त शासन चालवण्याच्या मुद्यावर येत्या महानगरपालिका निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
राजू शेट्टी सध्या संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, प्रामाणिक माणसांनी राजकारणात यायला हवे. पक्षाकडे अनेक प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याचे चेहरे आहेत. या चेहऱ्यांच्या बळावर स्वाभिमानी शेतकरी संघटना महानगरपालिका निवडणुकीत उतरणार आहे. संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी २० फेब्रुवारीपर्यंत दौरा आयोजित केलेला असून २२ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे राज्यपातळीवरील बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत प्रदेश, विभागीय व जिल्हापातळीवरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
कर्जमाफी बिनकामाची
महाआघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीवर टीका करताना शेट्टी म्हणाले, राज्य सरकारची ही बिनकामाची कर्जमाफी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचेही दुर्लक्ष होत आहे.