थकीत एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक

कोल्हापूर : गळीत हंगाम २०१७-१८तील एफआरपीचे थकीत दोनशे रुपये परत द्या, एफआरपी हफ्याने घेण्याबाबत जबरदस्तीने करार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा, ऊसाचा पहिला हफ्ता ठरल्याशिवाय कारखाने सुरु करु नका, आदी मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani sanghatana) पदाधिकाऱ्यांनी साखर सह संचालक एन. आर. निकम यांना सोमवारी दिले. दरम्यान, यावेळी चर्चेत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी निकम यांच्या अंगावर निवेदनाची प्रत भिरकावली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलीसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत केले.

लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. जिल्हा बँकेने सर्वच कारखान्यांना कोवीड आत्मनिर्भर कर्ज दिले आहे. यातून २०१७-१८ हंगामागतील थकीत प्रतिटन २०० रुपये शेतकऱ्याला द्यावेत. ज्या कारखान्यांनी मागील एफआरपी दिलेली नाही त्यांना गाळप परवाने देवू नयेत. पहिल्या हफ्ता देण्याबाबत निर्णय झाल्याशिवाय गळीत हंगाम सुरु करु नये, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

दरम्यान, निकम यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून त्यांच्या अंगावर भिरकावले. त्यानंतर जोरदार घोषणा बाजी करत कार्यकर्ते आक्रमक झाले. सहसंचालक कार्यालयात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर एन. आर. निकम यांनी कारखान्यांना नोटीसद्वारे सूचना करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, विक्रम पाटील, सागर कोंडेकर, आदींसह शेतकरी उपस्थित होते.

अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम एकरकमी न मिळाल्यास हफ्याने देण्यास हरकत नाही, असे करार शेतकऱ्यांकडून लिहून घेतले आहेत. सहकार कायद्याचा भंग करत असलेल्या कारखान्यांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करा. साखर आयुक्तांची दिशाभूल कारखाने करत आहेत. असे चुकीचे करार थांबवा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम हाती घेऊन सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER