सुव्रतचा आवाज आला लंडनमधून

Suvrat's voice came from London

‘गोष्ट एका पैठणीची’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा जेव्हा पडद्यावर दिसेल तेव्हा सुव्रत जोशी पडद्यावर अभिनय करताना दिसत असला तरी त्याचा आवाज मात्र थेट सातासमुद्रापार लंडनहून पोहचलेला असेल. म्हणजे सुव्रतचा अभिनय भारतात आणि आवाज लंडनमध्ये असा अनोखा योग पैठणीच्या ऑनस्क्रीन गोष्टीत दिसणार आहे. आजकाल सिनेमा असो, नाटक असो किंवा मालिका. सादरीकरणामध्ये अनेक प्रयोग केले जात आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिनेमा प्रेक्षकांसमोर मांडला जात आहे. पण ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमात सुव्रतचा आवाज लंडनहून येण्यामध्ये कोणताही प्रयोग नसून ती एक सोय आहे.

सध्या सुव्रत त्याची अभिनेत्री बायको सखी गोखलेसोबत लंडनमध्ये आहे. सखी तिथे उच्चशिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी सुव्रत आणि सखीचे लग्न झाले. एका नाटकाच्या दौऱ्यासाठी सुव्रत लंडनला गेला; मात्र कोरोनामुळे नाटकाचे प्रयोग थांबले आणि कोरोनाची साथ आल्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने सुव्रत लंडनमध्येच अडकला. लंडनला जाण्यापूर्वी सुव्रतने ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाचे चित्रीकरण केले होते. या सिनेमात त्याच्यासोबत सध्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत दिसणारी सायली संजीव नायिकेच्या भूमिकेत आहे.

कोरोनामुळे अनेकांच्या आयुष्यात विविध अनुभवांची भर पडत आहे. अनेक कलाकारांच्या हातात असलेल्या प्रोजेक्टच्या तारखा पुढे गेल्या आहेत तर अनेक कलाकारांच्या हातात कामच नाही. सुव्रत जोशीने या निमित्ताने एक भन्नाट अनुभव घेत लंडनमधल्या स्टुडिओतून ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाचे डबिंग पूर्ण केले. सुव्रत सांगतो, ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले. त्यानंतर डबिंगचा काही भागही मी पूर्ण केला; पण त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने डबिंग अर्धवट राहिले. दरम्यान मला लंडनला यावे लागले होते आणि लॉकडाऊनमुळे मलादेखील लंडनमधून भारतात येणे शक्य झाले नाही. आता लॉकडाऊननंतर सिनेमा, मालिकांच्या चित्रीकरणाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाचे उर्वरित डबिंग पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. साहजिकच मला याबाबत फोन आला; पण सध्या तरी मला लंडनमधून भारतात परतणे शक्य नसल्याने सिनेमाच्या टीमने पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यामुळे मी लंडनमधील एक स्टुडिओ शोधून तिथून संवाद डब करण्याचा निर्णय घेतला.

सुव्रतने लंडनमधील ज्या स्टुडिओमधून डबिंग केले तिथे सगळे तंत्रज्ञ बांगलादेश आणि पोलंडचे असल्याने सुव्रत काय संवाद म्हणतोय ते त्यांच्या डोक्यावरून जात होते. सगळंच ऑनलाईन सुरू होतं. इकडे भारतात बसून सिनेमाचे दिग्दर्शक शंतनु रोडे झूम अॅपच्या माध्यमातून स्क्रीनसमोर बसून राहात होते. तिकडे सुव्रत माइकसमोर उभे राहून संवाद डब करत होता.

मुळातच लॉकडाऊनमुळे चार महिने सिनेमा इंडस्ट्री ठप्प होती. याचा परिणाम पडद्यामागील आणि पडद्यावर काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या आर्थिक घडीवर झाला होता. आता जेव्हा सगळं रुळावर यावं यासाठी शूटिंगला नियमावली पाळून परवानगी दिल्याने ब्रेक लागलेल्या प्रोजेक्टनाही गती आली आहे. ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाचे कामही सुरू झाले असल्याने डबिंग पूर्ण होणे गरजेचे होते. आपल्यामुळे काम अडू नये यासाठी सुव्रतने लंडनमधून दिलेला आवाज हा या सिनेमासाठी वेगळा यूएसपी ठरणार आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून सुव्रत छोट्या पडद्यावर आला. त्यानंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटकही त्याने केले. ‘दिल दोस्ती दुनियादारी दोबारा’ या मालिकेतील सुव्रतच्या अभिनयानेही त्याच्या चाहत्यांमध्ये भर पडली. पुणेकर असलेल्या सुव्रत फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी असून त्याने अभिनयाचे धडे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गिरवले आहेत. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्याने अनेक नाटकांत काम केले असून ‘डोक्याला शॉट’ या सिनेमात त्याने गायलेल्या गाण्याचीही खूप चर्चा झाली होती. मोजकं पण नेमकं काम करण्यात त्याला जास्त रस असून भारंभार सिनेमे, मालिका करण्यापेक्षा दर्जेदार कथा व मांडणी असलेल्या प्रोजेक्टचा भाग व्हायला मला जास्त आवडतं असं तो सांगतो. ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमासाठी त्याने थेट लंडनमधून केलेल्या डबिंगच्या निमित्ताने त्याने लंडनमधील स्टुडिओतील तांत्रिक खूप प्रगत असल्याचेही अधोरेखित केले.

ही बातमी पण वाचा : अचानक या क्षेत्रात आलो -उमेश कामत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER