लंडन मुक्काम सुव्रतला ठरला फायदेशीर

suvrat joshi

माणसाला कुठली संधी कधी चालून येईल हे सांगता येत नाही. खरं तर सुव्रत जोशी (Suvrat Joshi) हा लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी लंडनला कामासाठी गेला होता. तो परत येणार इतक्यात लॉक डाऊन झाले आणि तो लंडनमध्येच अडकला. मात्र ऑक्टोबर महिन्यात अनलॉक सुरू झाल्यावर तो पुन्हा भारतात येण्याची तयारी करत असताना त्याला छूमंतर या सिनेमासाठी ऑफर आली आणि लंडनमध्ये थांबण्यासाठी सांगण्यात आले. सुव्रतसाठी तरी लंडनचा वाढलेला मुक्काम हा फायदेशीर ठरला आहे.

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या दोन्ही सीझनमध्ये दिसलेला सुव्रत जोशी या मालिकेनंतर अमर फोटो स्टुडिओ या नाटकातही दिसला. दहा वर्षात मोजकं पण लक्षात राहिल असं काम करत सुव्रतने मराठी सिनेमा , नाटक आणि मालिका इंडस्ट्रीत आपली चांगलीच ओळख बनवली आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी सखी हीच्यासोबत त्याने विवाह केला आणि ही दिल दोस्ती दुनियादारी ची जोडी प्रत्यक्ष आयुष्यात देखील एकमेकांची जोडीदार बनली.

मृण्मयी देशपांडे हिने दिग्दर्शित केलेल्या मन फकीरा या सिनेमातील सुव्रतचा अभिनय देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर मध्यंतरी लॉकडाउन पूर्वी शुट झालेल्या गोष्ट एका पैठणिची या सिनेमासाठी डबिंग थेट लंडनमधल्या स्टुडिओमध्ये केलं आणि हा अनुभव देखील त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. असे अनेक वेगवेगळे अनुभव सुव्रतला आले. सखीचे शिक्षण लंडनमध्ये सुरु असल्याने तो सध्या तिच्यासोबत लंडनमध्ये आहे. त्याच्या हातात काही ऑफर्स होत्या आणि काही जणांना भेटण्यासाठी तो ऑक्टोबर महिन्यात भारतात येणार होता. याच दरम्यान छूमंतर या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता.

लॉकडाऊन नंतर लंडनमध्ये शुट सुरु होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे छूमंतर हा एकाच वेळी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण सिनेमाचा भाग बनता येणार याचा आनंद होताच पण आपण ऑक्टोबरपर्यंत लंडन मध्ये अडकून पडल्याने आपण काहीच काम केलं नाही याचीदेखील खंत मनात कुठेतरी सलत होती. आणि अशाच एका वळणावर सुव्रतला छू मंतर या सिनेमाची ऑफर आली. या सिनेमासाठी आधीपासूनच सुव्रत लंडनमध्ये असल्याने त्याला वेगळा प्रवास करण्याची गरज पडली नाही मात्र या सिनेमासाठी रिंकू राजगुरु मुंबईतून रिंकू राजगुरु , प्रार्थना बेहेरे आणि ऋषी सक्सेना बडोद्यातून लंडनमध्ये दाखल झाले आणि एक महिन्यात या सिनेमाचं लंडनमध्ये शूटिंग पूर्ण करून सर्व प्रकारची काळजी घेऊन आता कलाकार आपापल्या घरी मायदेशी परतले आहेत. छू मंतर सिनेमाचे शूटिंग झाल्यानंतर सहज विचार करता करता सुव्रतला आयुष्यातल्या अशा वेगवेगळ्या वळण वाटांचा विचार मनात आला.

कधीकधी आपण एखाद्या ठिकाणाहून बाहेर पडण्याचा विचार करत असतो पण एक वेगळीच संधी तुमची वाट पहात असते. माझं लंडन मध्ये अडकून राहणं आणि ऑक्टोबरमध्ये भारतात परतण्याचा विचार करत असतानाच मला छूमंतर ची ऑफर येणं आणि लंडनमध्ये असताना हा सिनेमा मला पूर्ण करण्याची संधी मिळणे हे सगळं एका स्वप्नासारख आहे असं सुव्रत सांगतो. त्याने त्याच्या इन्स्टा पेजवर देखील या सिनेमच्या अनेक आठवणी आणि अनुभव शेअर केले आहेत.

पुणेकर असलेल्या सुव्रत फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी असून त्याने अभिनयाचे धडे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गिरवले आहेत. पुरूषोत्तम करंडक स्पर्धेत त्याने अनेक नाटकात काम केले असून डोक्याला शॉट या सिनेमात त्याने गायलेल्या गाण्याचीही खूप चर्चा झाली होती. मोजकं पण नेमकं काम करण्यात त्याला जास्त रस असून भारंभार सिनेमे, मालिका करण्यापेक्षा दर्जेदार कथा व मांडणी असलेल्या प्रोजेक्टचा भाग व्हायला मला जास्त आवडतं असं तो सांगतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER