साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आलेल्या संशयास्पद पत्राचे ‘पुणे कनेक्शन’

पुणे :- भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या घरी आलेल्या संशयास्पद पत्राचे ‘पुणे कनेक्शन’ असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील घरी पोस्टाद्वारे उर्दू भाषेतून पत्र पाठविण्यात आले होते. हे संशयास्पद पत्र पुण्यातून पाठविण्यात आले असून, या पत्रावर स्वामी रामचंद्र अय्यर ईश्वरचंद, असा पत्र पाठविणाऱ्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

या पत्रावर खडकीचा पत्ता असल्याचे वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, याबाबत अद्याप पुणे पोलिसांसोबत कुणी संपर्क साधला नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या छायाचित्रांवर लाल रंगाने फुली मारण्यात आली आहे, हे येथे उल्लेखनीय. या पत्राच्या लिफाफ्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या भुकटीच्या दोन पुड्या होत्या. या भुकटीला हात लावल्यामुळे खाज सुटत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.