मूल विक्री टोळीकडून बालकांचे अपहरण केल्याचा संशय

सुटका केलेल्या दोन बालकांच्या पालकांचा पत्ता नाही

kidnapping children

मुंबई :- दत्तक घेण्याच्या बहाण्याने गरीब, गरजू महिलांकडून त्यांची मुले ताब्यात घेऊन ती विकणाºया टोळीने काही बालकांचे अपहरण केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. याप्रकरणात आतापर्यंत सुटका करण्यात आलेल्या दोन बालकांच्या पालकांविशयी काहीही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. त्यामुळे अपहरणाच्या शक्यतेतून गेल्या पाच वर्षातील अपहरण झालेल्या मुलांच्या माहितीतून शोध सुरु आहे.

गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेने या टोळीला बेड्या ठोकत चौकशी सुरू केली. तेव्हा दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत या टोळीने मुंबईत दोन तर दिल्ली येथे दोन बालके(चारही मुलगे) विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने या चारही बालकांची सुटका करून या प्रकरणात गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने सुनंदा मसाने (३०), सविता साळुंखे-चव्हाण (३०), भाग्यश्री भागवत कोळी (२६) आणि आशा उर्फ ललिता जोसेफ (३५) यांच्यासह अमर देसाई आणि भाग्यश्री कदम (४२), दिल्लीतील नेहा गुप्ता, अभिनव अगरवाल, राहुल गुप्ता आणि जुलेहुमा दळवी यांना अटक केली आहे. या टोळीकडून आतापर्यंत ४ बालकांची सुटका करण्यात आली आहे.

सुटका केलेल्या दोन बालकांच्या पालकांचा विशेषत: मातांबाबत टोळीने चटकन पुढे केली. पथकाने या मातांकडे चौकशी करून खातरजमाही केली. मात्र उर्वरित दोन बालकांच्या पालकांबाबत टोळी तपास पथकाला तुटक माहिती दिली. त्याआधारे पालकांचा शोध घेण्यासाठी बरीच धडपड पथकाने केली. मात्र अद्यााप पालकांचा शोध लागलेला नाही.

आरोपींच्या देहबोलीवरून त्या या बालकांच्या पालकांबाबत खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती देत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांनी विक्रीसाठी बालकांचे अपहरण केले असावे किंवा ही बालके रुग्णालयांमधून चोरली असावीत, असा संशय आहे. त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. त्यासाठी गेल्या पाच वर्षांत शहरात रुग्णालयातून चोरी झालेल्या किंवा अपह्रत झालेल्या बालकांची, त्या प्रकरणांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.