ज्येष्ठ पत्रकार गुहा ठाकूरता यांच्यावरील वॉरन्टला स्थगिती

Gujarat HC

अहमदाबाद :  अदानी उद्योग समूहाने दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात ज्येष्ठ पत्रकार प्रणय गुहा ठाकूरता यांच्याविरुद्ध कच्छमधील मुंद्रा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरन्टला गुजरात उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. ठाकूरता यांनी सन २०१७ मध्ये ‘दि इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल विकली’ या नियतकालिकाचे संपादक असताना त्यात लिहिलेल्या एका लेखावरून अदानी उद्योग समूहाने हा बदनामी खटला दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात या खटल्याची तारीख होती तेव्हा ठाकूरात हजर नव्हते. त्यांच्या वकिलांनी त्या एक दिवसापुरती गैरहजेरीची सूट देण्यासाठी अर्ज केला.

परंतु तो फेटाळून दंडाधिकाऱ्यांनी  अटक वॉरन्ट जारी केले होते. तो आदेश रद्द करावा यासाठी ठाकूरता यांनी गुजरात उच्च न्यायालयात याचिका केली. त्यावर न्या. बी. एन. कारिया यांच्यापुढे सुनावणी झाली  तेव्हा ठाकूरता यांच्या वकिलांनी असा मुद्दा मांडला की, आधी समन्स किंवा जामीनपात्र वॉरन्ट न काढता दंडाधिकाऱ्यांनी थेट अजामीनपात्र अटक वॉरन्ट काढले आहे. असे करणे कायद्याच्या विरुद्ध आहे.

खटल्याच्या पुढील तारखांना न चुकता हजर राहण्याची लेखी हमी ठाकूरता दंडाधिकाऱ्यांना देतील, असेही वकिलांनी सांगितले. यावर न्यायालयाने वॉरन्टला स्थगिती देत गुजरात सरकारला नोटीस काढली व पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी ठेवली.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER