ठाकरे सरकारचा एक वर्षाचा प्रवास: ‘स्थगिती सरकार ते सूड घेणारे सरकार’ – मुनगंटीवार

Sudhit Mungantiwar

नागपूर :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने १ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र या एक वर्षात ठाकरे सरकारने सरकारने जनतेच्या हिताचे कुठलेही निर्णय घेतले नाही. गजनीच्या हिरेसारखा या सरकारला पॅालीटीकल अल्झायमर झाला आहे. या सरकारविरोधात संधी मिळेल तिथे जनतेनी असंतोष व्यक्त करावे, असे आवाहन माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज केले. मुनगंटीवार यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने ३६५ दिवसांत जनतेच्या अपेक्षांचा मोठा भंग केला आहे. त्यामुळेच या सरकारचा खरा चेहरा जनतेला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सरकारला जाब विचारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिवेशन घेणं हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीवर असता कामा नये. संविधान सभेने या संदर्भात निर्णय घेतला आहे. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, यासाठी अधिवेशन घेतलं पाहिजे. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेणं १९५३ च्या करारानुसार आवश्यक आहे. पण या सरकारची कोरोना व्हायरशी चर्चा झाली. बैठकीत कोरोना व्हायरसने नागपूरमध्ये याल तर त्रास देईन, पण मुंबईत अधिवेशन घ्याल तर मी तुमच्या वाटेत येणार नाही, असं सांगितलं”, असा उपरोधिक टोला मुनगंटीवार यांनी लगावला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभरामध्ये एकदाही विदर्भात पाय ठेवला नाही. विदर्भात उष्णता खूप असते. पण हिवाळ्यात विदर्भात उष्णता इतकी असते का पाय दिला तर पाय भाजेल?, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. एक वर्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भात पाय ठेवला नाही. विदर्भाची फसवणूक केली. विदर्भात पाय दिला नाही समजू शकतो. पण विदर्भासाठी एखादी बैठकही घेतली नाही. विदर्भ वाऱ्यावर सोडला. आमच्या विदर्भाचे पुत्र नानासाहेब पाटोले विधानसभेचे अध्यक्ष आहेत. नावाप्रमाणे त्यांनी तरी सरकारला अधिवेशन नागपूरला होणार नाही या निर्णयावर नाना म्हटलं असतं. पण त्यांनी सुद्धा नकार दिला नाही हे आश्चर्य आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले.

लोकमान्य टिळकांचं वाक्य सर्वांना माहिती आहे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आजही सरकारचे निर्णय पाहिल्यावर हाच प्रश्न उपस्थित होतो. पण आज लोकमान्य टिळक असते तर सरकारच ठिकाणावर आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला असता. कारण एक वर्षात मुख्यमंत्र्यांची कोणतीही मुलाखत बघा, याचं भाष्य ऐका, आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला, त्याची इतिहासात नोंद झाली. पण राज्य सरकारचं कार्य शून्य आहे. जे करायचं ते केंद्र सरकार करेल हा शोध या सरकारने लावला आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे सरकारला रडणारं सरकार म्हटलं. खरंतर संविधानात केंद्र सूचीत ९७ विषय आहेत, तर राज्य सूचीत ६६ विषय आहे. पण प्रत्येक मंत्री आपलं अपयश केंद्राच्या माथी मारतो आहे. केंद्राने जीएसटी दिला नाही, केंद्राने मदत केली नाही, वीजबिल माफ करायला केंद्राने पैसे द्यावेत, अशी अपेक्षा करतात. यांनी फक्त मंत्रिपदाच्या पाट्या लावायच्या, नवी दालनं करायची. याचं काम काय आहे? संविधानाच्या राज्यसूचीतील ६६ विषयांचे प्रश्न सोडवण्याची आणि न्याय देण्याची जबाबदारी केंद्राची आहे का? दुर्दैवाने महाराष्ट्रात लढणारं नाही, तर रडणारं सरकार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : तुम्ही फक्त मंत्रिपदाच्या पाट्या लावायच्या, तुमचं काम काय?, सुधीर मुनगंटीवारही कडाडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER