पबवर कारवाई केली म्हणून निलंबित! पोलीस निरीक्षकाचा परमबीर सिंह यांच्यावर आरोप

Maharashtra Today

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर ‘वसुलीच्या टार्गेट’चे आरोप केले. आता पोलीस निरीक्षक अनुप डांगे (Anup Dange)यांनी परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावर, पबवर कारवाई केली म्हणून निलंबित करणे आणि पुन्हा कामावर घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला आहे.

परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप लावला तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप केला आहे. गावदेवी पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार केल्याचे पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रात अनुप डांगे यांनी तक्रार केली आहे की, एका पबवर कारवाई केली म्हणून आयुक्तांनी माझ्याविरुद्ध कारवाई केली. अनुप डांगे यांनी २ फेब्रुवारी रोजी ही लेखी तक्रार अपर मुख्य गृहसचिवांकडे केली आहे.

डांगे यांनी आरोप केला आहे की, गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या ‘डर्टी बन्स सोबो’ या पबवर २२ नोव्हेंबर २०१९ रोजी मी कारवाई केली होती. पबचा मालक जीतू नावलानी याने तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असलेल्या परमबीर यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत, असे सांगून कारवाईस विरोध केला होता. त्यानंतर एसीबीच्या कार्यालयातून परमबीर सिंह यांनी मला भेटण्यासाठी बोलावल्याचा फोन आला होता. मी भेटायला गेलो नाही.

नंतर, परमबीर सिंह मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर अनुप डांगे यांची विभागीय चौकशी सुरू झाली. ४ जुलै २०२० रोजी माझी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली झाली आणि १८ जुलै रोजी मला निलंबित करण्यात आले, असे डांगे यांनी म्हटले आहे.

या दरम्यान, मी परमबीर यांचा चुलत भाऊ आहे, असे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबवण्यासाठी ५० लाख रुपये मागितले व निलंबन रद्द करून पुन्हा कामावर घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी केली, असा गंभीर आरोप अनुप डांगे यांनी केला आहे.

परमबीर सिंह यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध आहे, असे डांगे यांनी त्या पत्रात म्हटले आहे. एकीकडे परमबीर सिंह हे गृहमंत्र्यांवर आरोप करत असताना मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक यांनी देखील परमबीर सिंहांवर गंभीर आरोप केले आहेत. या दोन पत्रांमुळे मुंबई पोलीस खाते ढवळून निघाले आहे.

ही बातमी पण वाचा : परमबीर सिंह यांच्या पत्रातली ‘ती’ तारीख चूक ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER