वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी मूल्यमापनावर तीन महिन्यांसाठी बंदी

Banned TRP

मुंबई : टीआरपी घोटाळा समोर आल्यानं ब्रॉडकास्ट ऑडियन्स रीसर्च कौन्सिलनं (बार्क) एक धाडसी निर्णय घेतला आहे. बार्ककडून वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी मूल्यमापनावर तीन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनने स्वागत केले आहे. मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात टीआरपी मोजणाऱ्या यंत्रणेशी छेडछाड करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता.

जाहिरातीच्या दृष्टीने जास्तीत जास्त टीआरपी पदरात पाडून घेण्यासाठी वाहिन्यांकडून सुरू असलेला हा गैरप्रकार समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे बार्कसह संबंधित यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या. रिपब्लिक टीव्हीनं अधिक टीआरपी मिळवण्यासाठी काही जणांना पैसे दिले, असा आरोप मुंबई पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांना अटक केली.

या सगळ्या प्रकारानंतर बार्कच्या संचालक मंडळाकडून भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल, याचा आढावा घेतला जाईल. देशातील सर्व भाषांतील वृत्तवाहिन्यांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठीच बार्ककडून तीन महिने टीआरपीचे आकडे जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER