ज्या खेळाडूने लोकप्रियता वाढवली त्यानेच डागाळली कुस्तीची प्रतिमा!

Maharashtra Today

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममधील मारहाण प्रकरण, त्यात तरूण पहिलवानाचा झालेला मृत्यू आणि याचप्रकरणात दुहेरी आॕलिम्पिक पदक विजेता असलेल्या सुशीलकुमारसारख्या (Sushil kumar) नामांकित मल्लाचे फरार होणे यामुळे भारतीय कुस्तीची (Indian Wrestling) प्रतिमा अतिशय डागाळली आहे त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघ (WFI) अतिशय चिंतीत आहे. एवढ्या साऱ्या वर्षांच्या मेहनतीने कुस्तीची वाढलेली लोकप्रियता आणि या खेळाला मिळालेली प्रतिष्ठा या प्रकरणामुळे धुळीस मिळाल्याचे महासंघाचे मत आहे. योगायोगाने कुस्तीच्या या नावारुपात सुशीलकुमारच्याच यशाचे सर्वाधिक योगदान होते आणि आता त्याच्यावरील आरोपांनीच या खेळाची प्रतिष्ठा घालवली आहे. विरोधाभास हा की, यंदाच आॕलिम्पिकसाठी भारताचे सर्वाधिक आठ मल्ल पात्र ठरले आहेत.

सुशीलकुमार हा आजही भारताचा एकमेव विश्वविजेता (2010) पहिलवान आहे. आॕलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारा तो केवळ कुस्तीच नाही तर कोणत्याही खेळातील एकमेव भारतीय खेळाडू आहे. पण आता त्याच सुशीलमुळे या खेळाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे.

डब्ल्यूएफआयचे सहसचिव विनोद तोमर (Vinod Tomar) यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाने कुस्तीचे फार मोठे नुकसान झाले आहे हे नक्कीच! पण पहिलवान आखाड्याच्या बाहेर काय करतात त्याच्याशी आमचा काही संबंध नसतो. त्यांच्या मॕटवरील कामगिरीपुरताच आमचा संबंध येतो.

2008 च्या बीजिंग आॕलिम्पिकमधील सुशीलच्या यशाने कुस्तीगिरांवर एवढा प्रभाव पाडला की, योगेश्वर दत्त, फोगाट भगिनी, साक्षी मलिक, बजरंग पुनिया, रवी दहिया व दीपक पुनिया हे त्या प्रभावानेच पुढे आले. पण आता सुशीलकुमारचा पाच राज्यात शोध सुरू असल्याने हे सर्व व इतर मल्ल धक्क्यात आहेत. सागरच्या हत्येमागे सुशीलकुमारची काय भूमिका आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

याच्याआधी कुस्ती प्रशिक्षक सुखविंदर मोर हासुध्दा फेब्रुवारीत रोहतक येथे सहकारी प्रशिक्षक मनोज मलिकसह पाच लोकांच्या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचे उघड झाले होते. त्याप्रकरणानेही कुस्तीच्या प्रतिमेला फार मोठा धक्का बसला होता. या प्रकरणामुळे कुस्तीची हा भांडखोरांचा व गुंडांचा खेळ आहे ती प्रतिमा पुसण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरले असल्याचे तोमर यांनी म्हटले आहे. सुखविंदर याचा मलिकसोबत वैयक्तिक वाद होता आणि त्यातून त्याने पाच लोकांना गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर दिल्ली व हरियाणा पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवून त्याला दिल्लीतून अटक केली होती.

आता महासंघाच्या वार्षिक करारातून सुशीलकुमारला बाहेर करण्यात येईल का? या प्रश्नावर तोमर म्हणाले की, साध्यातरी तसा काही विचार नाही. कुस्ती महासंघाने डिसेंबर 2018 मध्ये सुशीलकुमारसह चौघांना वार्षिक 30 लाख रुपयांचा करार दिलेला आहे. मात्र त्यानंतर सुशील फक्त 2019 च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाला होता आणि त्यातही तो पहिल्याच फेरीत बाद झाला होता.

सागरला मारहाणीच्या घटनेने छत्रसाल स्टेडियमकडे बघण्याचाही लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. याच संकुलाने सुशीलकुमारशिवाय योगेश्वर दत्त, बजरंग पुनिया, रवी व दीपक पुनियासारखे मल्ल दिले आहेत पण यापैकी योगेश्वर व बजरंग या दोघांनाही तेथे सुशीलकुमार गटाच्या दादागिरीचा सामना करावा लागला आहे. या दोघांनाही छत्रसाल स्टेडियममध्ये सुशीलचा गट सांगेल तसेच वागण्याचा इशारा देण्यात आलेला होता. छत्रसाल स्टेडियमची सुत्रे 2016 पर्यंत सुशीलचे गुरू आणि सासरे सत्पालसिंह यांच्याकडे होती. त्यानंतर त्यांनी ही सुत्रे सुशीलकुमारकडे सोपवून या स्टेडियमवर आपली पकड कायम राखली आहे. त्यामुळे छत्रसाल स्टेडीयममध्ये सुशीलकुमारच्या गटाचे न ऐकणारांचा छळ केला जातो, लोक घाबरून त्याबद्दल काही बोलत नाहीत कारण त्यांना करियर करायचे असते, भानगडीत पडायचे नसते, त्यामुळे बरेच जण येथून लवकर बाहेर पडतात असा कुस्तीगिरांचा अनुभव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button