सुशीलकुमारने कुस्तीदिनीच लावला कुस्तीला कलंक !

SushilKumar - Maharashtra Today

भारतीय क्रीडा क्षेत्राचा ज्याने गौरव वाढवला त्यानेच भारतीय क्रीडा क्षेत्राच्या नावावर कलंक लावला. ज्या हातांनी अभिमानाने तिरंगा फडकावला त्याच हातात बेड्या पाहायला मिळाल्या. ज्याचा विजयी व आनंदित चेहरा भारतभरातील सर्व माध्यमांनी ठळकपणे प्रसिद्ध केला तोच चेहरा आज झाकलेला आणि पोलिसांच्या गराड्यात असलेला माध्यमांकडे आला. दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता पहिलवान सुशीलकुमार (SushilKumar) याच्या अटकेनंतर क्रीडा जगतात या भावना आहेत. दुर्दैवी योगायोग हा की, जागतिक कुस्तीदिनाच्या दिवशीच एका ऑलिम्पिक पदक विजेत्या मल्लाने कुस्तीच्या इतिहासासाठी हा नकोसा अध्याय लिहिला आहे.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये ४ मे रोजी मालमत्तेच्या वादावरून झालेल्या मारहाणीत सागर धनखड (वय २३) या युवा पहिलवानाची हत्या झाल्याप्रकरणी सुशीलकुमारला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना घडल्यापासून सुशीलकुमार फरार होता आणि पाच राज्यांमध्ये त्याचा शोध सुरू होता. त्याची माहिती देणाराला दिल्ली पोलिसांनी एक लाखाचे बक्षीसही जाहीर केले होते. सुशीलकुमारच्या या प्रकरणातील सहभागाबद्दल जशी अविश्वासाची भावना आहे तशी क्रीडा जगतात निराशासुद्धा आहे.

या प्रकरणात सुशीलकुमारने फरार असतानाच अटकपूर्व जामीन मिळवायचेही प्रयत्न केले होते; पण न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्याच वेळी तो पोलिसांना शरण येणार असल्याचीही चर्चा होती; पण असे काही घडले नाही.

सागर धनखड हा बेदम मारहाणीत जबर जखमी झाल्यानंतर ५ मे रोजी मरण पावला. दिल्लीतील पोलीस कॉन्स्टेबलचा हा मुलगा छत्रसाल स्टेडियममध्ये सराव करायचा.

सुशीलकुमार हा दोन वेळचा ऑलिम्पक पदक विजेता असण्यासोबतच तीन वेळचा राष्ट्रकुल सुवर्ण विजेता आणि कुस्तीतील एकमेव भारतीय विश्वविजेतासुद्धा आहे. त्याने भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी जे काही केलेय त्याची बरोबरी इतर कुणीच करू शकत नाही. आताच या विषयावर भाष्य करणे चुकीचे ठरले. काय काय घडलेय ते चौकशीत समोर आल्यावरच बोलणे योग्य होईल, असे ऑलिम्पकपटू बॉक्सर विजेंदर सिंग याने म्हटले आहे. सुशील व विजेंदर या दोघांनीही २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेले आहे. टेबल टेनिसपटू शरथ कमलने म्हटलेय की, आता जे दिसतेय खरोखर तसेच घडले असेल तर ते दुर्दैवी आहे आणि त्याने कुस्तीच नाही तर भारताच्या एकूणच क्रीडा क्षेत्राच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवला आहे. माजी हॉकी कर्णधार अजित पाल सिंग यांनी नेमके सुशीलच्या बाबतीत कुठे आणि काय चुकलेय तेच कळेनासे झालेय. पण जे काही घडलेय ते दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे. सुशीलकुमारसारखे खेळाडू ज्यांना लाखो युवक आदर्श मानतात त्याच्याकडून असे वर्तन चुकीचेच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button