सुशीलकुमारसाठी वादविवाद काही नवीन नाहीत

Sushilkumar

युवा पहिलवान सागर धनखडच्या (Sagar Dhankar) हत्येप्रकरणी (Murder) पोलीस कोठडीत गेलेला आॕलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमारसाठी (Sushilkumar) वादविवाद काही नवीन नाहीत. अर्थात हाणामारी व खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात तो पहिल्यांदाच अडकला असला तरी पहिलवान म्हणून त्याची कारकिर्द वादविवादांनी भरलेली आहे.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये जिथे ही घटना घडली त्या आखाड्यावर सुशीलचे सासरे सतपालसिंह यांचे नियंत्रण आहे. त्यांनी ह्या स्टेडियमची धुरा सुशीलकडे सोपवली आहे. ह्या आखाड्यात सराव करायचा असेल तर सुशीलकुमार गट म्हणेल तेच ऐकावे लागते अन्यथा बाहेर पडावे लागते. बजरंग पुनियासारख्या नामवंत मल्लाला हा अनुभव आला आहे.

2016 च्या रियो आॕलिम्पिकवेळी नरासिंग यादव खेळेल की सुशीलकुमार याच्यावरुन मोठा वाद झाला होता. भारतीय कुस्ती महासंघाने नरसिंग यादवची निवड केली होती, परंतु पुढे जाऊन तो डोप चाचणीत दोषी आढळला होता. त्यावेळी त्याने सुशीलकुमार गटाने आपल्या अन्नात काहीतरी मिळवल्याचा आरोप केला होता मात्र हे आरोप सिध्द होऊ शकले नव्हते.

2018 च्या राष्ट्रकुल सामन्यांच्या चाचणीवेळी सुशीलकुमारने अंतिम सामन्यात प्रविण राणाला मात दिली होती त्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. ही लढत सुशीलच्या दबावामुळे वारंवार थांबविण्यात आली, पंचांना धमकावण्यात आले होते त्यामुळे सुशीलकुमारला विजेता घोषीत करण्यात आले असे आरोप राणाने केले होते.

सुशीलकुमार हा भारतीय शालेय क्रीडा महासंघाचाही अध्यक्ष (President of the School Games Federation of India (SGFI)) अध्यक्ष आहे आणि अलीकडे हा महासंघ वेगळ्याच कारणांनी बातम्यांमध्ये होता. महासंघाचे नियम बदलण्यासाठी एसजीएफआयच्या सचिवांनी आपल्या बनावट सह्या केल्याच्या आणि त्या बनावट सह्यांआधारे गैरव्यवहार केल्याचाही आरोप सुशीलकुमारने केला होता. या प्रकारांसाठी गेल्या डिसैंबरात त्याने महासंघाच्या सचिवाविरुध्द पोलिसांत तक्रारही दिली होती आणि त्यानंतर मार्चमध्ये सुशीलकुमार पुन्हा एसजीएफआयच्या अध्यक्षपदी निवडून आला होता.

याप्रकारे सुशीलकुमारची कारकिर्द वादविवादांपासून अलिप्त राहिलेले नाही पण आखाड्यात भल्या भल्या मल्लांचा सामना करणारा आणि त्यांना आसमान दाखविणाऱ्या या पहिलवानाने आयुष्यात जेंव्हा लढायची वेळ आली तेंव्हा परिस्थितीचा सामना करण्याऐवजी पळ काढला आणि तो फरार घोषित झाला ह्याच्याने त्याची सर्व प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. सागर धनखडच्या हत्याप्रकरणात तो दोषी आहे की नाही हे अद्याप सिध्द व्हायचे आहे पण सुशीलने पलायन न करता पोलिसांना तपासात सहकार्य केले असते तर त्याच्या प्रतिमेला एवढा धक्का पोहोचला नसता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button