माझ्यासारख्या माणसावरही मोदींनी जादू केली होती – सुशीलकुमार शिंदे

Sushilkumar Shinde-PM Modi

सोलापूर : अजूनही मोदीबाबांची हवा थोडी थोडी आहे, माझ्यासारख्या माणसावरही जादू केली होती, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले. सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. येथे ते बोलत होते.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “शिवसेनेसारख्या पक्षाला आम्ही किमान समान कार्यक्रमात समाविष्ट करून महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलर सरकार आणलं. ही सुरुवात आहे. म्हणून आता जास्त जबाबदारी वाढली आहे. गावागावांतील तरुण पोरं… मला माहितीय की, अजूनही मोदीबाबांची हवा थोडी थोडी आहे. त्यांनी जादू आमच्यावरही केली होती. माझ्यासारख्या माणसावरही त्यांनी जादू केली होती.

मीसुद्धा सुरुवातीची दोन वर्षे त्यांच्या कामाने भारावून गेलो होतो; पण देशाची आर्थिक स्थिती बिघडायला लागली, तरुणांना नोकरी देण्याबाबत दिशाभूल व्हायला लागली, जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धर्माधर्मात वेडीवाकडी भूमिका घेऊन देश बिघडवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आता मोदी सरकारचे अपयश दिसायला लागले आहे. मात्र, आताही मोदीबाबांची थोडी थोडी हवा आहे, असे शिंदे म्हणाले. त्याचप्रमाणे, मोदींच्या राज्यात जी धार्मिक तेढ निर्माण झाली आहे, त्यामुळे आपण अतिशय सावध असलं पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.

शिंदे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौ-यावरही भाष्य केले. ते म्हणाले, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते. मोदींनी भाषण करून त्यांचं स्वागत केलं. सगळं भाषण जर आपण ऐकलं असेल, तर ट्रम्प आणि मोदी यांच्या मैत्रीविषयीचं आहे. म्हणून कुणीतरी विचारलं, तुम्हाला ट्रम्प पाहिजे की अमेरिकन जनता पाहिजे? वैयक्तिक मैत्री दोघांची असू शकते; पण अमेरिकन जनता आपल्या पाठीशी आहे की नाही हा आमचा सवाल आहे, असं शिंदे म्हणाले.