सुशांतचा ‘व्हिसेरा’ योग्यरीत्या संरक्षित ठेवला नाही!

Sushant Singh Rajput

मुंबई : सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात रोज नवी माहिती उघड होते आहे. सुशांतचा ‘व्हिसेरा’ योग्यरीत्या सुरक्षित ठेवला नव्हता. यामुळे तपासात अडचणी येत आहेत, असे कळते. सुशांतचा मृत्यू विषामुळे झाला की ‘ड्रग्जच्या ओव्हरडोज’मुळे या संदर्भात तपास सुरू आहे. यात व्हिसेरा अहवाल अतिशय महत्त्वाचा आहे.

आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) (AIIMS) सूत्राच्या हवाल्याने एआयएनएसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंटला सुशांतचा जो व्हिसेरा मिळाला, तो अतिशय कमी होता आणि योग्यरीत्या संरक्षित ठेवला नव्हता. यामुळे केमिकल व टॉक्सिकोलॉजिकल चाचण्यांमध्ये अनेक समस्या जाणवत आहेत.

आम्ही पूर्ण प्रयत्न केले : मुंबई पोलीस (Mumbai Police)
सुशांतचा व्हिसेरा योग्यरीत्या संरक्षित केला नाही हा दावा मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाकारला आहे. सुशांतप्रकरणाशी संबंधित सर्व फॉरेन्सिक व कागदोपत्री पुरावे सुरक्षित ठेवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. आम्ही अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास केला आहे. तपासाच्या बाबतीत मुंबई पोलीस प्रचंड ‘प्रोफेशनल’ आहेत, असे हा अधिकारी म्हणाला.

एम्सच्या अहवालाची प्रतीक्षा
सुशांतचा पोस्टमार्टम आणि व्हिसेरा अहवाल तयार करण्यासाठी एम्सच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांची विशेष टीम गठित करण्यात आली आहे. या अहवालातून सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या की हत्या हे स्पष्ट होणार आहे. आज २० सप्टेंबरला संबंधित टीम सीबीआयला (CBI) अहवाल सोपवणार होती. मात्र त्यांची बैठक झाली नाही. आता सीबीआय व एम्स टीमची बैठक मंगळवारी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER