सुशांत मृत्युप्रकरण : सिद्धार्थ, दीपेश यांनी केली सरकारी साक्षीदार होण्याची विनंती

Siddharth Pithani - Dipesh Sawant - Sushant Singh Rajput

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणातील दोन साक्षीदार सिद्धार्थ पिठाणी आणि दीपेश सावंत यांनी सरकारी साक्षीदार होण्याची सीबीआयकडे विनंती केल्याचे कळते.

सुशांत मृत्युप्रकरणी रोज नवीन माहिती उघड होते आहे. सीबीआयने (CBI) आतापर्यंत रिया चक्रवर्ती हिच्यासह सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणी, घरगुती व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, स्वयंपाकी नीरज, दीपेश सावंत, केशव यांची चौकशी केली आहे.

सिद्धार्थ पिठाणी आणि दीपेश सावंत यांनी सरकारी साक्षीदार होण्याचे मान्य केले आहे. सिद्धार्थ आणि दीपेश दोघांनीही स्वतःहून सीबीआयकडे सरकारी साक्षीदार होण्याची विनंती केल्याचे समजते. सिद्धार्थ आणि दीपेश हे दोघेही ८ ते १४ जूनच्या काळात सुशांतसोबत त्याच्या घरी राहात होते.

सिद्धार्थची स्वतंत्र चौकशी
सीबीआय शुक्रवारी सकाळपासूनच सिद्धार्थ पिठाणीची चौकशी करत होती. दरम्यान सीबीआयने सिद्धार्थला डीआरडीओ गेस्ट हाऊसमधून बाहेर काढून मुंबईतील सीबीआयच्या मुख्यालयात नेले. डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये कमी खोल्या असल्यामुळे सिद्धार्थची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी त्याला मुख्यालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

अज्ञात लोकांचीही चौकशी
सीबीआय मुख्यालयात यापूर्वी तीन ते चार अज्ञात व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली. त्यावेळी सीबीआयच्या मुख्यालयात दीपेश सावंतही हजर होता. दरम्यान, दीपेश आणि सिद्धार्थ या दोघांनाही सरकारी साक्षीदार करण्याआधी सीबीआयला आवश्यक ती कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागेल.

कुठे खर्च झालेत ७० कोटी?
गेल्या पाच वर्षांत सुशांतच्या खात्यामध्ये ७० कोटी रुपये होते. त्यातील बरीच रक्कम खर्च झाली आहे. यातली मोठी रक्कम संपत्ती, लक्झरी कार आणि बाईक खरेदी करण्यासाठी वापरली गेली. अपार्टमेंटच्या भाड्यासाठीदेखील बराच पैसा खर्च झाला. कोट्यवधी रुपये एफडी आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत. बरीच रक्कम सुशांतने केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठीदेखील दान दिली होती. ऑडिट अहवालानुसार सुशांतच्या बँक खात्यातील जवळपास ५० लाख रुपये रिया आणि तिच्या भावासाठी खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये युरोप टूर, शॉपिंग, स्पा, हॉटेल आणि तिकीट बुकिंगचा समावेश आहे. मात्र सुशांतकडून रियाच्या खात्यात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण झाले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER