सुप्रियाताई सुळेंशी टॅक्सीचालकाचे गैरवर्तन: ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने

Demonstrations by NCP in Thane

ठाणे (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्याशी गैरवर्तन करणार्‍या टॅक्सीचालकावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

सुप्रिया सुळे काल देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. सुळे यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कुलजीतसिंह मल्होत्रा नावाचा टॅक्सी चालक दादर टर्मिनस येथे गाडीत प्रवेश करीत प्रवाशांना भाड्यासाठी हुज्जत घालत होता. मल्होत्राने सुप्रिया सुळेंना गाठले आणि तो त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. सुळे यांनी त्याला दोनदा नकार दिला. मात्र, मल्होत्रा ऐकेचना. त्याने सुप्रिया सुळेना पुढे जाऊ न देता अडवून धरले.

ही बातमी पण वाचा : बारामती देशात अव्व्ल असल्याने ती सगळ्यांना हवी आहे – सुप्रिया सुळे

या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे महिलाध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली काळ्या साड्या परिधान करुन निदर्शने केली. यावेळी महिला आंदोलकांनी गृहखात्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, जो प्रकार मुंबईत घडला; तसाच प्रकार ठाण्यातही घडण्याची शक्यता असल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले. या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग म्हणाल्या की, सुप्रियाताई सुळे यांच्यासारख्या व्यक्तीला जर टॅक्सी चालक असा त्रास देत असतील तर सामान्य महिलांची सुरक्षा वार्‍यावरच असल्याचे दिसत आहे. आज युती सरकारच्या काळात लहान मुली, तरुणी, महिला असुरक्षित असल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सरकारला महाराष्ट्रातील महिला खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत.