सुप्रिया सुळेंचे मिशन मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी मिशन मोडवर कामाला लागण्याचे आदेश

Supriya Sule & BMC

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावे यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र आता खुद्द सुप्रिया सुळे या रणांगणात उतरल्याने या चर्चेवर पडदा पडला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काल मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात महिला संघटनेची बैठक घेतली. यावेळी सुळे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मिशन मोडवर कामाला लागण्याचे निर्देश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गांभीर्याने घेतली असून या काळात तळमळीने काम करणारे पदाधिकारी पक्षाला हवे आहेत. मुंबईतील महिला कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे काम करण्याची गरज आहे. वेळ पडल्यास जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले तरी चालेल. महिला कार्यकर्त्यांनी मुंबईकरांच्या विषयांना प्राधान्य देऊन काम करायला हवे. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक असावे यासाठी मिशन मोडवर काम करा, असे आदेश सुप्रिया सुळे यांनी महिला कार्यकर्त्यांना दिले.

महिलांनी आक्रमकपणे काम करण्यासाठी यापुढे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मुंबईतील सर्व महिला पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष आणि नगरसेवकांची बैठक होणार असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच मुंबईतील सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरांवर सहा मेळावे घेऊन महिलांना तयार करण्याचे काम करणार, असेही सुळे यांनी सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्ष उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER