रेस्टॉरंटस व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळेंचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

CM Uddhav Thackeray - Supriya Sule - Restaurants

मुंबई : लॉकडाऊनमुळे (Lockdown) जवळपास ५ महिन्यापासून रेस्टॉरंटस (Restaurants) बंद आहेत. रेस्टॉरंटस चालकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन मागणी केली आहे. याआधी जिम आणि सिंगल स्क्रीन थिएटर सुरु करण्याची मागणी सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबचे मुख्य समन्वयक वेदांशू पाटील (Vedanshu Patil) यांनी नुकताच सुळेंची भेट घेतली. महाराष्ट्रातील रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या वतीने रेस्टॉरंट पूर्ववत सुरू करावे असे निवेदन त्यांना देण्यात आले होते. त्यानंतर सुळे यांनी ही मागणी केली आहे.

“कोरोनाच्या (Corona) संकाटामुळे राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सल्सची मुभा देण्यात आली असली, तरी ती या उद्योगाला सावरण्यासाठी पुरेशी नाही. याशिवाय अनेक रेस्टॉरंट चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.” असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

“रेस्टॉरंट व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंटस् सुरु होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग आदीचे आवश्यक दिशानिर्देश देखील जारी करावेत. आपणास विनंती आहे, की कृपया या व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा” अशी विनंती सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करुन केली आहे. ‘महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लब’चे मुख्य समन्वयक वेदांशू पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना लिहिलेले पत्रही त्यांनी सोबत जोडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER