स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नाने वस्तीत पोहचली वीज; ग्रामस्थांचा जल्लोष

Maharashtra Today

पुणे : जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात (Mulshi taluka) येणाऱ्या लव्हार्डे गावाजवळ दुर्गम भागात असलेल्या बावधने वस्तीवर वीज पोहचली आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. सुळे यांच्या सूचनेनुसार या वस्तीवर आज महावितरणची वीज (Electricity) पोहचताच ग्रामस्थांनी गुढी उभारून आनंद व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, महावितरणचे मुळशी उपविभागीय अभियंता फुलचंद फड यांच्यासह सुहास दगडे, शंकर धिंडले, माणिक गायकवाड, नितीन भोईटे, रवी शेंडे, जगदीश धर्माधिकारी, नथू बावधने, समीर बावधने, महावितरणचे कर्मचारी तानाजी पाडोळे, दत्ता हरपुडे, भास्कर फड आदी यावेळी उपस्थित होते.

वस्तीवर वीज पोहचताच खासदार सुप्रिया सुळे यांच्यावतीने ग्रामस्थांना लाडू आणि पेढे वाटून त्यांचा आनंद आणखी द्विगुणित करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी सुळे यांनी गावाला भेट दिली असता, त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्याकडे वीज पुरवठ्याबाबत मागणी केली होती. याची दखल घेत त्यांनी लागलीच महावितरणच्या मुळशी विभागाकडे या विषयाचा पाठपुरावा केला. तातडीने येथे वीज पुरवठा करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. महावितरणचे खांब बसविण्यात आले. आठ दिवसांत ते काम पूर्ण होऊन आज वीज पोहचली. वस्तीवर प्रकाश आल्याचा आनंद समस्त ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहात होता. सगळ्यांनी टाळ्या आणि आरोळ्याच्या गजरात विजेचे स्वागत केलेच; शिवाय गुढी उभारत सुप्रिया सुळे यांचे भरभरून आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button