बारामतीला देशात नंबर एकचा मतदारसंघ करायचाय; सुप्रिया सुळेंचा बारामतीकरांसाठी खास संदेश

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघाचे आभार मानले आहेत.

सुप्रिया सुळे या सलग तीन वेळा बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्याला दोन वर्षे पूर्ण होण्याचे औचित्य साधून त्यांनी फेसबुकवर बारामतीकरांसाठी एक खास पोस्ट केली आहे .

सुप्रिया सुळे या लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांंपैकी एक आहेत. यामुळे त्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानितदेखील करण्यात आले होते. मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभारही मानले.

सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट :
“आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे सलग तिसऱ्यांदा लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची आपण सर्वांनी मला संधी दिली त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. आपण माझ्यावर जो विश्वास, प्रेम आणि आपुलकी दाखविली त्याच्या ऋणातून उतराई होण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीत असते.”

बारामती लोकसभा मतदारसंघ हा माझं कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येक जण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या हिताच्या मुद्यांची केंद्रात तड लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपल्या आशीर्वादामुळेच मी हे काम करू शकतेय, आपल्या शुभेच्छांचे बळ माझ्या पाठीशी आहे याची मला जाणीव आहे.

आपला बारामती मतदारसंघ सर्व सुविधा व सेवांच्या बाबतीत देशात नंबर एकचा मतदारसंघ करायचाय हे आपणा सर्वांच्या साथीने पाहिलेले स्वप्न आहे. जे पूर्ण करण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीत आहे. आपण दोन वर्षांपूर्वी निवडून दिलेल्या सतराव्या लोकसभेचे कामकाज सुरू झाले व कोरोनाचे थैमान सुरू झाले .

यामुळे बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. आपली सर्वांची संपूर्ण शक्ती केवळ या विषाणूचा सामना करण्यात खर्च होत आहे. तरीही आपण पायाभूत सुविधांच्या बाबतीत काही महत्त्वाची कामे करू शकलो आहोत. याशिवाय आरोग्यसेवा अधिकाधिक मजबूत करण्यासाठीदेखील आपण प्रयत्न करीत आहोत.

कोरोनाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी अगदी गावपातळीवरील यंत्रणाही पूर्ण क्षमतांनिशी काम करीत आहेत. या सर्वांचा आढावा मी सातत्याने घेत असते. कोरोनाच्या या स्थितीमुळे आपल्या प्रत्यक्ष भेटींवर मर्यादा आल्या आहेत. पण सोशल माध्यमे व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण भेटत आहोत.

ही स्थिती लवकरात लवकर आटोक्यात येऊन सर्वांचे आयुष्य पूर्वपदावर येईल आणि सर्व काही सुरळीत होईल असा विश्वास आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button